डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
मराठी साहित्यविश्वात अनेक प्रतिभावान साहित्यिकांनी आपल्या लेखणीनं समाजमन समृद्ध केलं आहे. त्यापैकी डॉ. सरोजिनी बाबर यांचं नाव विशेष आदरानं घेतलं जातं. लोकसाहित्याचा अभ्यास, ग्रामीण संस्कृतीचं जतन, प्रभावी लेखन आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. आपल्या साहित्यकृतींमधून त्यांनी ग्रामीण जीवन, लोकपरंपरा आणि स्त्रीजीवनाचं वास्तववादी चित्रण केलं आहे. सरोजिनी बाबर या केवळ लेखिका नव्हत्या तर मराठी संस्कृतीचं जतन करण्यासाठी कार्य करणाऱ्या संवेदनशील अभ्यासकही होत्या. त्यांच्या साहित्यिक वाटचालीबरोबरच राजकीय क्षेत्रातलं कार्यही तितकंच महत्त्वाचं आहे. एवढं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असूनही त्या अतिशय साध्या आणि सुस्वभावी होत्या. त्या काळातल्या अनेक मान्यवर व्यक्तींशी त्यांची मैत्री होती तरीही त्यांचे पाय कायम जमिनीवरच होते.
सरोजिनीबाई या खऱ्या अर्थानं भूमिकन्या होत्या. सात्त्विकता, सुसंस्कृतता आणि सृजनशीलता यांचा उत्तम संगम त्यांच्या ठायी होता. भाषा आणि स्वर यांवर त्यांची विलक्षण हुकूमत होती. त्यामुळेच त्यांना लोकसंगीत आणि लोकपरंपरांचं संकलन आणि संपादन करता आलं. आमदार आणि खासदार असतानाही लोकसाहित्याच्या संपादनाचं त्यांचं काम अजिबात थांबलं नाही. त्यांचं आयुष्य थक्क करणारं आहे. माणूस एका आयुष्यात किती वेगवेगळी कामं करू शकतो हे सरोजिनीबाईंकडे पाहिल्यावर लक्षात येतं.
सरोजिनी बाबर यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी सातारा जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील बागणी या गावी झाला. त्यांचे वडील श्री. कृष्णराव बाबर आणि आई सौ. गंगुबाई. कृष्णराव (अण्णा) हेही लेखक होते. सरोजिनीबाईंचं शालेय शिक्षण प्रामुख्यानं इस्लामपूर इथं झालं. १९४० साली त्या शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९४४ साली पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. ही पदवी मिळवली. पुढे मुंबई विद्यापीठातून एम.ए. आणि डॉक्टरेट या पदव्याही संपादन केल्या.
स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. १९५२ ते १९५७ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या होत्या. १९६३ ते १९६६ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचं सदस्यत्व भूषवलं. १९६८ ते १९७४ या काळात त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्या होत्या.
राजकारणात त्यांना फारसा रस नव्हता, पण राजकारणात राहूनही समाजासाठी काही विधायक काम करता येऊ शकतं, यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्या राजकारणात राहिल्या. एकीकडे राजकारणात सक्रिय असतानाच त्या आपल्या आवडीच्या साहित्यिक क्षेत्रातही तितक्याच उत्साहानं काम करत होत्या. त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा सखोल अभ्यास केला. लोकसाहित्याचं संशोधन, संकलन आणि संपादन केलं. ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती’च्या त्या अध्यक्षा होत्या. माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या सल्ल्यानुसार, महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षणमंत्री श्री. बाळासाहेब देसाई यांनी या समितीची स्थापना केली. सुरुवातीला समितीचे अध्यक्ष श्री. चिं. ग. कर्वे होते. त्यांच्यानंतर हे पद सरोजिनीबाईंकडे आलं.
१९५८ साली ‘नियोजन आयोगाच्या शिक्षण विभागा’च्या शिफारसीनुसार दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रीशिक्षणासंबंधी एक आयोग स्थापन करण्यात आला. सरोजिनीबाई या आयोगाच्या सचिव होत्या.
सरोजिनीबाईंचं वाचन प्रचंड होतं. त्या उत्तम वक्त्याही होत्या. त्यांच्या या वक्तृत्वकलेचा राजकारणात त्यांना खूप उपयोग झाला. त्यांनी संगीताचा औपचारिक अभ्यास केला नव्हता; पण त्यांचा आवाज अतिशय गोड होता. सूर आणि ताल यांची त्यांना उत्तम जाण होती. लोकसंगीताची त्यांना विशेष आवड होती. त्या लोकगीतं अतिशय सुंदर पद्धतीनं म्हणत. त्यांनी अनेक लोकगीतं आकाशवाणीवर सादर केली. त्यांच्या गायनाचा प्रभाव अनेक नामवंत गायक आणि गायिकांवर पडला होता.
लोकसाहित्य आणि लोकगीतांचा अमाप साठा त्यांच्याकडे होता. वेळ मिळेल तेव्हा त्या खेड्यापाड्यांत जात, तिथल्या स्त्रियांना भेटत आणि त्यांच्याकडून ओव्या, उखाणे तसंच वेगवेगळ्या प्रसंगी म्हटली जाणारी गाणी गोळा करत. या कामातूनच पुढे त्यांनी अनेक पुस्तकांचं संपादन केलं. ‘मराठीतील स्त्रीधन’, ‘स्त्रियांचे खेळ आणि गाणी’, ‘भोंडला’, ‘भुलाबाई’, ‘राजविलासी केवडा’ आणि ‘महाराष्ट्र लोकसाहित्य माले’चे पाच खंड ही त्यांची काही महत्त्वाची संपादने आहेत. ‘माझ्या खुणा माझ्या मला’ हे त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
२३ डिसेंबर १९८४ रोजी मुंबई दूरदर्शनवरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. १९९० पासून मुंबई दूरदर्शननं त्यांची ‘रानजाई’ ही तेरा भागांची मालिका सादर केली. या मालिकेत सरोजिनी बाबर आणि शांताबाई शेळके या दोघींनी महाराष्ट्रातील लोकसंगीत आणि लोकगीतांची ओळख करून दिली. मराठी गाणी, नृत्यं आणि रीतिरिवाज यांचं चित्रण असलेली ही मालिका अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं सादर करण्यात आली होती. सरोजिनी बाबर आणि शांताबाई शेळके यांच्या चर्चेतून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये जपल्या गेलेल्या परंपरा आणि रीतिरिवाज यांची माहिती मिळते.
माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून सरोजिनीबाईंनी एकदा लोकसाहित्यविषयक संमेलन भरवलं. या संमेलनात अनेक परिसंवाद आयोजित करण्यात आले. त्याच वेळी लोककलांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं.
‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’तील त्यांचा सहभाग अत्यंत मोलाचा होता. या मंडळाच्या माध्यमातून अनेक चांगल्या पुस्तकांची निर्मिती झाली.
सरोजिनीबाईंचे वडील श्री. कृष्णराव बाबर यांनी ‘समाज शिक्षण माला’ सुरू केली. या मालेच्या माध्यमातून प्रौढ शिक्षणाचं काम केलं जात असे. विविध विषयांवर छोटी छोटी पुस्तकं प्रकाशित केली जात. या पुस्तकांमध्ये कृष्णराव, सरोजिनीबाई आणि त्यांच्या दोन धाकट्या बहिणी कुमुदिनी व शरदिनी यांनी लिहिलेल्या एकूण २५५ पुस्तकांचा समावेश होता. ही पुस्तकं शिक्षण, समाजकारण आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित होती. कृष्णरावांनी त्यांच्या हयातीत २८० पुस्तकं प्रसिद्ध केली, तर त्यांच्या पश्चात सरोजिनीबाईंनी २७० पुस्तकं प्रकाशित केली.
याशिवाय सरोजिनीबाईंनी ‘मी पाहिलेले यशवंतराव’ आणि ‘वसंतदादा पाटील गौरव ग्रंथ’ या दोन ग्रंथांचं संपादन केलं. कुमारवयीन मुलांसाठीही त्यांनी काही पुस्तकांचं सहसंपादन केलं.
त्यांच्या स्वतंत्र लेखनातील काही पुस्तकं विशेष लक्षात घेण्यासारखी आहेत. त्यांनी ७ कादंबऱ्या, ११ कथासंग्रह, २६ ललितलेखन संग्रह, २ काव्यसंग्रह, नाट्यवाङ्मयाची ४ पुस्तकं आणि एक आत्मचरित्र अशी एकूण ५१ पुस्तकं लिहिली. याशिवाय त्यांनी एकूण ३६० पुस्तकांचं संपादन केलं. त्यांपैकी लोकसाहित्यविषयक महत्त्वाची संपादने म्हणजे ‘जन-लोकांचा सामवेद’, ‘साज-शिणगार’, ‘मराठीतील स्त्रीधन’, ‘बाळराजे’, ‘कुलदैवत’ आणि ‘राजविलासी केवडा’.
सरोजिनीबाईंना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांपैकी काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’, ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार’ आणि ‘मराठा सेवा संघ विश्व गौरव पुरस्कार’. काही विद्यापीठांनी त्यांना ‘डी.लिट.’ पदवी देऊन सन्मानित केलं.
लोकसाहित्याचं संकलन आणि संपादन हे त्यांचं सर्वांत महत्त्वाचं कार्य म्हणावं लागेल. त्यांच्या या कामामुळे लोकसाहित्याचं दस्तऐवजीकरण झालं. आधुनिकीकरणामुळे लोकगीते आणि लोकसाहित्य हळूहळू काळाच्या पडद्याआड जाऊ लागलं होतं. खेड्यापाड्यांतही आता अशी गाणी फारशी म्हटली जात नाहीत. या समृद्ध साहित्याचं जतन करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. सरोजिनीबाईंनी हे काम प्रचंड चिकाटीनं आणि उत्साहानं केलं. लोकगीते, ओव्या, उखाणे आणि लोकसंगीत हा आपला समृद्ध साहित्यिक वारसा आहे. त्यात त्या काळातल्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीचं प्रतिबिंब उमटलं आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती’च्या माध्यमातून हे मोलाचं काम झालं आणि आपला समृद्ध वारसा जतन करण्यास मोठी मदत झाली.
सरोजिनीबाईंच्या काळात खेडोपाडी भोंडला, मंगळागौर, हळदीकुंकू, डोहाळेजेवण, बारसं यांसारखे अनेक कार्यक्रम स्त्रिया मोठ्या उत्साहानं साजरे करत. आता असे कार्यक्रम हळूहळू काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत किंवा त्यांच्या स्वरूपात अनेक बदल झाले आहेत. त्या काळात म्हटली जाणारी गाणी, ओव्या आणि उखाणे आजच्या पिढीला माहीतही नाहीत. सरोजिनीबाईंच्या कामामुळे हे लोकसंगीत आज आपल्याला निदान वाचायला आणि ऐकायला तरी मिळत आहे.
अशा या प्रतिभावंत लेखिका, उत्कृष्ट व्याख्यात्या, संपादिका, राजकारणी आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांनी २७ एप्रिल २००८ रोजी कृतार्थ आयुष्य जगून जगाचा निरोप घेतला. मात्र आजही लोकसाहित्याचा विषय निघाला की त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं