डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
साहित्य हा प्रत्येक समाजाचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा असतो. तो जतन करणं हे सामाजिक कर्तव्य असतं. भारतात वेद, उपनिषदं, पुराण, रामायण, महाभारत यांसारखं अक्षरवाङ्मय रचलं गेलं. ज्या काळात छपाईची कला अवगत नव्हती, त्या काळापासून महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात लोकांनी हे साहित्य मुखोद्गत केलं आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे मौखिक परंपरेनं पोहोचवलं.
लोकसाहित्य म्हणजे केवळ ओव्या, भारुडं, कहाण्या, देवदेवतांची गाणी किंवा पारंपरिक फुगडी, झिम्मा यांसारख्या खेळांची गाणी नव्हेत. लोकसाहित्याचा संगीत, नृत्य, गीत आणि कथांशीही जवळचा संबंध आहे. लोकजीवनाचं प्रतिबिंब म्हणजे लोकसाहित्य, असं म्हणता येईल. यातील अनेक गाण्यांचे रचनाकार कोण, हे माहीत नसतं. आपण ज्या कहाण्या वाचतो, त्यांची सुरुवात असते, ‘आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करीत होता.’ या कहाण्या फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्या कोणी लिहिल्या, हे माहीत नाही. असं लोकसाहित्य पिढ्यान्पिढ्या पाठांतरातून पुढे आलं. हा समाजाचा अमूल्य ठेवा आहे.
मात्र, असं साहित्य किंवा लोकगीतं कुठल्याही पुस्तकात छापलेली नसतात. ती लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. अनेक वर्षांच्या अनुभवातून आणि निर्मितीतून हे लोकसाहित्य आकाराला आलं आहे. त्यात मनातील भावना आणि विचारांचं प्रामाणिक प्रतिबिंब दिसतं. त्यातील वर्णनं साधी, सरळ आणि समाजजीवनाचं दर्शन घडवणारी असतात. बाळाला अंगाई म्हणताना, झोपाळ्यावर झोके घेताना, शेतात काम करताना, जात्यावर दळताना किंवा श्रावण महिन्यात मंगळागौरीच्या वेळी खेळताना स्त्रिया अनेक गाणी म्हणत असत. त्यांत माहेरचं कौतुक आणि सासरच्या चालीरीतींचं वर्णन असे. लग्नातील हळदीचा प्रसंग, रुखवत, घाणा भरणं अशा वेळीही त्या नवरीसाठी साध्या-सोप्या शब्दांत गाणी म्हणत. बारसं किंवा डोहाळेजेवणाच्या प्रसंगीही त्या आपल्या भावना, विचार आणि अनुभव सुंदर शब्दांत व्यक्त करत. थोडक्यात, घरगुती जीवनापासून तत्त्वज्ञानापर्यंत अनेक विषय या लोकसाहित्यात सामावलेले आहेत. असं साहित्य गोळा करून त्याचं संपादन करणं हे मोठं जिकिरीचं काम आहे. सरोजिनीबाईंनी ते काम केलं.
या साहित्य आणि गीतांमधून त्या काळातील चालीरीती, लोकजीवन आणि सामाजिक मूल्यांची ओळख होते. लोकसाहित्याचं संकलन करून ते पुढच्या पिढ्यांना उपलब्ध करून देण्याचं मोलाचं काम सरोजिनीबाईंनी खूप मेहनतीनं केलं. त्यातूनच मराठीतील ‘स्त्रीधन आणि वनिता सारस्वत’ (१९६१), ‘स्त्रियांचे खेळ आणि गाणी’ (१९७७), ‘स्त्री शिक्षणाची वाटचाल’ (१९६८), ‘भाषा व संस्कृती’, ‘मराठी लोककथा’, ‘लोकगीतातील सगे सोयरे’, ‘महाराष्ट्र – लोकसंस्कृती व साहित्य’, ‘लोकसाहित्य – भाषा व संस्कृती’, ‘लोकसाहित्य साजशृंगार’, तसेच ‘महाराष्ट्र लोकसाहित्य माले’चे पाच भाग असे अनेक ग्रंथ निर्माण झाले.
सरोजिनीबाईंनी समाजात प्रचलित असलेली अनेक गाणी, ओव्या, कथा आणि लोकपरंपरा संकलित करण्यासाठी आयुष्यभर संशोधन केलं. मागासलेल्या समाजात जागृती घडवण्याचं कामही केलं. आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या पेलत असतानाही त्यांनी बहुजन समाजाचं सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रतिनिधित्व सातत्यानं केलं. लोकसाहित्यातला मौल्यवान ठेवा गोळा करून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केलं.
मराठी साहित्यविश्वात सरोजिनी बाबर यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्या उत्कृष्ट लेखिका, संपादिका आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक होत्या. ग्रामीण संस्कृती, लोकपरंपरा आणि स्त्रियांचं जीवन यांचं वास्तवदर्शी चित्रण त्यांनी आपल्या साहित्यात केलं.
कथा, कादंबरी, चरित्र, बालसाहित्य, ललित लेखन आणि लोकसाहित्य अशा साहित्याच्या विविध प्रकारांत त्यांनी लेखन केलं. त्यांची भाषा सोपी आणि ओघवती असल्यामुळे त्यांचं लिखाण समाजातल्या सर्व स्तरांतील वाचकांना आवडलं. ओव्या, म्हणी आणि निरनिराळ्या प्रसंगी म्हटली जाणारी गाणी यांचं संकलन करून त्यांनी मराठीच्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन केलं.
लोकसाहित्याचं संकलन करताना त्यांना खूप प्रवास करावा लागला. अनेक लोकांच्या भेटी घ्याव्या लागल्या. एखाद्याला भेटल्यानंतर त्या त्याची माहिती टाचण करून ठेवत असत. या टाचणांमधील माहितीची सत्यता तपासण्यासाठी कधी कधी त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जावं लागे.
‘कुलदैवत’ या ग्रंथाच्या वेळी एक गंमत झाली. या ग्रंथात मल्हारी मार्तंडाविषयी लिहिलं होतं. त्या लिखाणातील माहिती खरी आहे की नाही, हे तपासण्यासाठी सरोजिनीबाई जेजुरीच्या गडावर गेल्या. गडावर पोहोचताच कोणीतरी त्यांच्या अंगावर धावून आलं आणि म्हणालं,
“तुम्ही काँग्रेसवाल्यांनी आमचा देव चोरून नेला आहे आणि आता परत का आलात?”
त्यावर सरोजिनीबाईंनी आवाज चढवून सांगितलं,
“मी महाराष्ट्राच्या या कुलदैवताचा आशीर्वाद घ्यायला आले आहे. माझं नाव सरोजिनी बाबर. ‘कुलदैवत’ ग्रंथासाठी मी या महादेवाबद्दल लिहिलं आहे. ते लिखाण तपासून पाहायला मी आले आहे.”
हे ऐकल्यावर तो माणूस गप्प झाला. त्यानंतर त्यानं वाघ्या-मुरळींना सरोजिनीबाईंच्या स्वागतासाठी बोलावलं. सरोजिनीबाईंनी यापूर्वी आपल्या घरी जेजुरीच्या वाघ्या-मुरळींना बोलावून त्यांच्याकडून गाणी घेतली होती. त्या जेजुरीच्या गडावर आल्या आहेत, हे कळल्यावर ते लोकही गड चढून वर आले. देवळाचे पुजारी अण्णांचे विद्यार्थी होते. त्यांनाही सरोजिनीबाई आल्याचं कळताच ते तिथं आले. त्यानंतर बाईंची खणा-नारळानं ओटी भरण्यात आली.
सरोजिनीबाईंनी जमलेल्या लोकांना बानू आणि मल्हारीची प्रेमकहाणी सांगितली. ही लोककथा त्यांना एका धनगरानं सांगितली होती. तो म्हणाला होता की, मल्हारी आणि बानू जेजुरीला आल्यावर म्हाळसा संतापली. तेव्हा मल्हारीनं बानूला एका बाजूला आणि म्हाळसेला दुसऱ्या बाजूला बसवलं. मल्हारी स्वतः दोघींच्या मध्ये बसला. ही गोष्ट खरी आहे का, हे तपासण्यासाठीच सरोजिनीबाई जेजुरीला गेल्या होत्या.
लोकसाहित्याचं संकलन करताना अशा अनेक गमतीजमती सरोजिनीबाईंच्या आयुष्यात घडल्या.
सरोजिनीबाई आपल्या मामाकडे बागणी येथे गेल्या की अनेक खेडूत स्त्रिया त्यांना भेटायला येत. त्यात भाजी विकणारी रखमा, गोधडी शिवून देणारी लक्ष्मी, गोवऱ्या विकणारी सीता चांभारीण, कासारीण अशा अठरापगड जातींच्या स्त्रिया असत. या प्रत्येक स्त्रीकडे लोकगीतांचा जणू खजिनाच असे. त्यांच्यापैकी कोणी भेटायला आलं की, सरोजिनीबाईंबरोबर त्यांची मैफील रंगत असे.
साध्यासुध्या कपड्यांत, कधी कधी अगदी फाटकं लुगडं नेसलेल्या या स्त्रिया त्यांना लोकगीतं म्हणून दाखवत. साधं बोलतानाही त्या शब्दांच्या लगडीच्या लगडी सरोजिनीबाईंसमोर उघडत असत. अशा शब्दमैफलींमध्ये सरोजिनीबाई मनापासून रंगून जात. लोकगीतांचा एवढा मोठा खजिना जवळ बाळगणाऱ्या या स्त्रिया पाहून त्यांना त्यांचा हेवाही वाटे. त्यांची गाणी ऐकताना मात्र सरोजिनीबाईंची ब्रह्मानंदी टाळी लागत असे. आमदारकी-खासदारकीची वस्त्रं बाजूला ठेवून त्या या स्त्रियांच्या प्रेमात रंगून जात. त्या वेळी त्यांना वाटे की या क्षणी सर्व सुखांच्या राशी आपल्या पायाशी लोळण घेत आहेत. या स्त्रिया आपल्या ओटीत शब्दरूपी हिऱ्या-माणकांची रास ओतत आहेत. अशा वेळी त्या स्वतःला अत्यंत भाग्यवान समजत असत.
लोकसाहित्य गोळा करण्यासाठी सरोजिनीबाई खेड्यापाड्यांत जात. या स्त्रियांना कधी त्यांच्या घरी, तर कधी शेतात भेटत. त्यांच्या घरची चौकशी करत. कधी कधी त्यांच्याबरोबर दळणकांडणही करावं लागे. त्यानंतरच त्या स्त्रिया त्यांच्यावर विश्वास ठेवत. एकदा मैत्री झाली की, त्या मनमोकळेपणानं आपली गाणी म्हणून दाखवत. अंगडे-टोपडे आणि बिंदल्या-मनगट्या घातलेल्या बाळाचं, लाल पटका बांधलेल्या भाऊरायाचं, इरकली लुगडं नेसलेल्या वहिनीचं आणि सुरकुत्या पडलेल्या वृद्ध आईचं वात्सल्य त्या साध्यासुध्या, रांगड्या शब्दांतून व्यक्त करत. ही शब्दचित्रं साध्या गद्यातून नव्हे, तर छोट्या छोट्या ओव्यांमधून उभी राहत. या ओव्यांमध्ये शब्द कमी, पण आशय मोठा असे. त्यांच्या काव्यात उपमा आणि दृष्टांत यांची पखरण केलेली असे.
कधी कधी त्यांतील काही शब्द सरोजिनीबाईंना समजतच नसत. कारण असे शब्द त्यांनी यापूर्वी कधी ऐकलेले नसत. त्यांनी त्या स्त्रियांना शब्दांचे अर्थ विचारले की, त्या पदराआड तोंड लपवून खुदुखुदू हसत आणि म्हणत,
“अगोबाई! एवढी शिकली-सवरलेली शहरातली बाई तू आणि हे तुला समजलं नाही!”
मग तिथं आणखीच गंमत होई. या लोकगीतांमधून त्या काळातील दागिने, वेशभूषा आणि सांस्कृतिक जीवनाचं दर्शन घडत असे. कधी कधी या गीतांमध्ये काही मुसलमानी, म्हणजे उर्दू शब्दही आढळत. पूर्वी महाराष्ट्रात मुस्लिम राजवटींचा प्रभाव असल्यामुळे हे शब्द लोकगीतांमध्ये आले असावेत.