डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
सरोजिनीबाईंच्या साहित्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण जीवनाचं आणि स्त्रीजीवनाचं वास्तवदर्शी चित्रण. निसर्ग, शेती, सण-उत्सव, लोकपरंपरा आणि खेडेगावातलं सामाजिक जीवन यांचं त्यांनी अत्यंत प्रभावी आणि जिवंत वर्णन केलं. त्यांच्या लिखाणातून ग्रामीण समाजातील साधेपणा, श्रमसंस्कृती आणि मानवी नातेसंबंधांचं दर्शन घडतं. विशेषतः ग्रामीण स्त्रियांचं कष्टमय जीवन, त्यांचा त्याग, संघर्ष आणि सहनशीलता यांचा त्यांनी जवळून वेध घेतला. घर, शेती आणि कुटुंब यांचा समतोल राखताना स्त्रियांना करावे लागणारे कष्ट त्यांनी वाचकांसमोर उभे केले. स्त्रीशिक्षणाचं महत्त्वही त्यांनी आपल्या लेखनातून अधोरेखित केलं. स्त्रिया आपल्या दैनंदिन जीवनातून संस्कृती आणि परंपरा कशा जतन करतात, हेही त्यांनी दाखवून दिलं. ‘कमळाचे जाळे’ आणि ‘अजिता’ या कादंबऱ्यांतून ग्रामीण समाज, स्त्रियांच्या भावना आणि त्यांच्या संघर्षांचं वास्तवदर्शी चित्रण केलं आहे.
ग्रामीण स्त्रियांच्या जीवनाचं सर्वांत प्रभावी दर्शन त्यांच्या ओव्यांमधून घडतं. पूर्वी खेडेगावातील स्त्रिया पहाटे उठून जात्यावर दळण करत असत. जात्याला त्या ईश्वर मानत. त्याला हळदीकुंकू वाहून, तीळ-तांदळाचा घास देत. जाते ओढणं हे कष्टाचं काम होतं; पण दळताना त्या ओव्या म्हणत असल्यामुळे त्यांना श्रमांचा विसर पडत असे. जात्यावर बसून त्या आपल्या मनातील सुख-दुःखं, भावना आणि अनुभव मोकळेपणानं व्यक्त करत. या ओव्यांमध्ये आई-वडील, भाऊ, सासू, नवरा, मुलगा, काकू, मावशी अशा जवळच्या नात्यांनाही स्थान मिळालं आहे. काही ओव्यांमधून मुलांच्या संगोपनाविषयीच्या कल्पनाही सहजपणे व्यक्त होतात.
एका ओवीत एक स्त्री आईनं लहानपणी आपल्याला कशी बाळगुटी पाजली, याचं वर्णन करते.
“दळण दळते मी, बाह्या माझ्या लोखंडाच्या
गुटी दिल्यात वेखंडाच्या, मायबाप हरीने.”
आईनं लहानपणी अशी काही गुटी दिली आहे की, आपण दणकट झालो आहोत आणि म्हणूनच जाते सहज ओढू शकतो, असा या ओवीचा अर्थ आहे.
कधी कधी सासरी कामं करून करून थकलेल्या स्त्रीला माहेरच्या माणसांची आठवण येते. त्यांना भेटावं, असं तिला वाटत असतं. अशाच वेळी अचानक वडील दारात उभे राहतात. ते पाहून ती म्हणते,
“जीवाला माझ्या जड, कसं कळालं माझ्या बापा?”
वडील तिला उत्तर देतात,
“अंगणी होता चाफा, कळ्या पडल्या झपाझपा.”
आपल्या अंगणातील चाफ्याच्या कळ्या पटापट पडल्या. त्यावरून तू माझी आठवण काढत आहेस, हे मला समजलं आणि म्हणून तुला भेटायला आलो, असा या उत्तराचा भावार्थ आहे.
अशा कितीतरी भावना या ओव्यांमधून व्यक्त होतात. जात्यासमोर बसून स्त्रिया आपल्या मनातलं सुख-दुःखं, सासुरवास आणि माहेरची ओढ अगदी मोकळेपणानं सांगत असत. बालपणी माहेरच्या घरी अनुभवलेलं मुक्त जीवन, तारुण्यातील नवथर भावना, लग्नानंतरचा संसार, एकत्र कुटुंबातील अनुभव, शेतीवाडीतील कष्ट, घरकाम आणि भाऊबंदकीतून निर्माण होणारे ताणतणाव अशा स्त्रीजीवनातील विविध अवस्थांचं चित्र या ओव्यांतून उमटतं.
हे साहित्य जपणाऱ्या स्त्रिया साध्या भोळ्या आणि अक्षरओळख नसलेल्या होत्या; पण त्यांच्याकडे अनुभवांचं आणि संस्कारांचं मोठं संचित होतं. जे मिळेल त्यात समाधान मानून, कधी अर्धपोटी राहूनही त्या कष्ट करत. उन्हातान्हात शेतात राबत. दारिद्र्य असूनही मनानं श्रीमंत असलेल्या या स्त्रियांच्या समाधानामुळे त्यांची चंद्रमौळी झोपडीही राजवाड्याहून वैभवशाली वाटत असे. अशा स्त्रियांकडून सरोजिनीबाईंना मौलिक विचारधनाचा खजिना मिळाला.
सरोजिनीबाईंनी लोकगीतांचं विषयानुसार वर्गीकरण करून त्यांची स्वतंत्र पुस्तकं प्रकाशित केली. ‘राजविलासी केवडा’ या पुस्तकात पती-पत्नीविषयक ओव्या, गाणी, उखाणे, लग्नाची गाणी, रुखवत, जावयावर केलेली गाणी आणि डोहाळे व डोहाळेजेवणाच्या वेळी म्हटली जाणारी गाणी समाविष्ट केली आहेत. याशिवाय या पुस्तकात लोककथाही आहेत. ‘आविष्कार’ या भागात विविध प्रांतांतील प्रेमगीते, विदर्भातील लोकांचा लग्नसोहळा, आदिवासींची विवाहपद्धती आणि वारली लोकांचे संसार अशा विविध विषयांवरील लेख आहेत.
‘बाळराजा’ या पुस्तकात बारशापासून मूल मोठं होईपर्यंतच्या विविध प्रसंगांशी संबंधित गाणी एकत्रित केली आहेत.
‘कुलदैवत’ या पुस्तकात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कुलदैवतांविषयी माहिती संकलित केली आहे. ‘नंदादीप’ या पुस्तकात विविध देवतांचा इतिहास, कुळाचार, नवसाच्या कहाण्या आणि लोकगीते यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर ग्रंथ प्रकाशित करत असे. मार्च १९७० मध्ये या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला. तज्ज्ञांकडून निबंध लिहून घेण्यात आले. त्यांपैकी काही निबंध एकत्र करून सुंदर चित्रांनी सजवलेला ‘नंदादीप’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकात एकूण २१ लेख आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतील लेखकांनीही त्यात सहभाग घेतला.
या लोकगीतांचं संकलन आणि संपादन हे काम केवळ सरोजिनीबाईंनी एकट्यानं केलं नव्हतं. त्यांच्या दोन्ही बहिणी कुमुदिनी पवार आणि शरदिनी मोहिते यांचाही त्यात मोठा सहभाग होता. आई गंगुबाई बाबर यांनीही या कामात मदत केली. याशिवाय श्री. अनिल पाटील, शशिकला साळगावकर, अनुताई वाघ, गंगाबाई धारक, सिंधुताई अंबिके, भाऊराव पोखरणीकर, लक्ष्मीकांत तांबोळी अशा अनेकांनी या कार्यात भर घातली. त्यांच्या सहकार्यानं विविध विषयांवरील, सुंदर मुखपृष्ठांनी सजलेले अनेक ग्रंथ महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीमार्फत प्रकाशित झाले.
या लोकगीतांचा पसारा प्रचंड मोठा आहे. पण त्यातील सहजता आणि साधेपणा मनाला भावतो. देवदेवतांविषयीच्या गीतांमध्ये अद्भुततेचा प्रभाव अधिक जाणवतो. ही गीते रचणाऱ्या स्त्रिया साध्यासुध्या, अशिक्षित होत्या. त्यांना धर्माची आणि देवाची प्रेरणा होती. तत्त्वज्ञानाचं औपचारिक ज्ञान नसलं, तरी देव आपल्या पाठीशी आहे, ही त्यांची भोळीभाबडी श्रद्धा होती. त्यातूनच अनेक देवदेवतांची गाणी निर्माण झाली. या गीतांमध्ये बहुतेक वेळा स्त्रिया देवाकडे काही ना काही मागताना दिसतात. त्यांच्या दैनंदिन जीवनातील चिंता, अपेक्षा आणि इच्छा या प्रार्थनांच्या रूपानं या गीतांतून व्यक्त होतात.