डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
७ जानेवारी १९२० रोजी सातारा जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील बागणी या गावी सरोजिनीबाईंचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव भाऊराव बाबर आणि आई गंगुबाई. बाबर घराण्याचं मूळ गाव चाफळ. पुढे हे कुटुंब वारणा नदीच्या काठावर वसलेल्या बागणी गावात स्थायिक झालं. बाबर घराण्याचं मूळ आडनाव ‘देशमुख’. परंतु त्यांचे पूर्वज अत्यंत पराक्रमी होते. त्यांच्या पराक्रमामुळेच त्यांना ‘बाबर’ हे आडनाव मिळालं. ‘बाबर’ म्हणजे सिंह!
त्या काळी बागणी हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. गावात संभाजी महाराजांच्या काळातील एक भुईकोट किल्ला होता. गंगुबाईंचं माहेरही बागणीतच होतं. घरातील मंडळी आणि नातेवाईक गंगुबाईंना प्रेमानं ‘अक्काताई’ म्हणत. लहान सरोजिनी म्हणजे कृष्णराव आणि गंगुबाई यांचं पहिलं अपत्य. सरोजिनी पाठोपाठ या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. त्यानंतर एक मुलगाही झाला; परंतु तो लवकरच वारला. कृष्णराव शिक्षण खात्यात नोकरीला होते. त्यांची नोकरी फिरतीची असल्यामुळे मुलींचं शिक्षण इस्लामपूर, सातारा, अहमदनगर आणि पुणे अशा वेगवेगळ्या शहरांत झालं.
सरोजिनीचं आजोळही बागणीत असल्यानं लहानपणी ती आईबरोबर अनेकदा आजोळी जात असे. आजी आणि मामीबरोबर अंगण झाडणं, सडा घालणं, रांगोळी काढणं, भाकरी करणं, आजीची देवघरातील भांडी घासून देणं, परसातील फुलं तोडणं, ताकाचा डेरा घुसळणं, कापसाच्या वाती वळणं, चंदन उगाळून देणं, आजीला सुईत दोरा ओवून देणं अशी नानाविध कामं ती करी. या सगळ्या कामांत दिवस कधी उजाडायचा आणि कधी संपायचा, हे तिला समजतही नसे.
सरोजिनीचं बालपण ग्रामीण संस्कृती, लोकपरंपरा आणि मराठी संस्कारांनी समृद्ध अशा वातावरणात गेलं. ग्रामीण जीवनातील अनुभव, लोकसंस्कृती आणि सामान्य माणसांचं जीवन यांचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला.
आजोळी सरोजिनीचे खूप लाड होत. आजी तिला न्हाऊ घालत असे. मामी पाचपेडी वेणी घालून त्यात चांदीचे मखमली गोंडे बांधत असे. मग ही वेणी पाठीवर रुळू देत छोटी सरोजिनी घरभर ऐटीत फिरे. सरोजिनी लहानपणी ‘लाडूबाई’ होती. ती झिम्मा, फुगडी खेळत असे आणि भातुकलीचा खेळ मांडत असे. सकाळी मामीबरोबर जात्यावर दळण दळायला बसे आणि तिच्याकडून ओव्या ऐकत असे. प्रत्येक कामात तिला रस असे. दुपारी शेजारच्या मुलींबरोबर सागरगोटे, काचापाणी, टिक्कर असे खेळ खेळत तिचा दिवस मजेत संपत असे. त्यातून श्रावण महिना असेल तर गंमत काही विचारूच नका! झोक्यावर बसून गाणी म्हणायची, नागपंचमी आणि राखी पौर्णिमेचे सण साजरे करायचे. कोणाकडे मंगळागौर असेल तर तिथे खुशाल रात्रभर जागून अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. असं सुंदर बालपण सरोजिनीला लाभलं.
खेडेगावातील स्त्रियांचं जीवन सरोजिनीनं जवळून पाहिलं. बहुतेक स्त्रिया पहाटे सूर्योदयापूर्वी उठून सडा-रांगोळी करीत. त्यानंतर जात्यावर दळण दळत. दळण दळताना त्या ओव्या म्हणत. पुढे पूजा करणं, देवांसाठी फुलं गोळा करणं अशा कामांबरोबरच निरनिराळ्या देवतांची स्तोत्रं, गाणी आणि भजनं म्हणत. वर्षभर येणाऱ्या सणावारांच्या वेळीही या बायका एकत्र जमून गाणी म्हणत. हे सगळं पाहत आणि ऐकतच सरोजिनी मोठी झाली. त्यातून तिला लोकसंगीताची विशेष आवडही निर्माण झाली.
लहानपणी सरोजिनीला पोलिओ झाला. त्यामुळे तिच्या डाव्या पायात अधूपणा आला. तरीही ती सर्व खेळांत उत्साहानं भाग घेत असे. फेर, झिम्मा आणि फुगडी या खेळांत तर ती सर्वांच्या पुढे असे. शाळेतही ती अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत असे. महाविद्यालयात असताना बॅडमिंटन खेळण्याचाही तिचा छंद होता. एव्हडंच नाही तर तिला गड-किल्ले चढण्याचीही आवड होती. हळूहळू का होईना, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गड-किल्ल्यांवर जाऊन तिथली माती कपाळी लावायला तिला खूप आवडत असे. पायात अधूपणा आला म्हणून ती कुठेही मागं हटली नाही. पुण्यात असताना तिनं अनेकदा पर्वती आणि चतु:शृंगीच्या टेकड्या चढल्या.
सरोजिनी वडिलांना ‘अण्णा’ म्हणत असे. अण्णा शिक्षक होते. त्यामुळे त्यांच्या अनेक ओळखी होत्या. ते प्रामुख्यानं ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीत भाग घेत असत. त्यामुळे घरी नेहमी लोकांचा राबता असे. अण्णा पुढारलेल्या विचारांचे होते. त्या काळच्या समाजात जातिभेद आणि सोवळे-ओवळे कटाक्षाने पाळले जात असे. परंतु अण्णा अस्पृश्यता पाळत नसत. त्यांना जातिभेद मान्य नव्हता. घरात सोवळं-ओवळंही नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे, असं त्यांचं ठाम मत होतं.
त्या काळात मुलींनी शिक्षण घेणं आणि घराबाहेर पडणं समाजमान्य नव्हतं. परंतु अण्णांचे विचार पुरोगामी होते. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, असं त्यांना वाटत असे. सरोजिनीची सकारात्मक विचारसरणी ही तिला आई-वडिलांकडून मिळालेली देणगी होती. गंगुबाईही खंबीर होत्या. समाज काय म्हणेल, याकडे त्या फारसं लक्ष देत नसत. आपण जे करत आहोत ते योग्य आहे असं वाटत असेल तर कोणालाही घाबरण्याचं कारण नाही, असं त्यांचं म्हणणं असे. गंगुबाई गोड आवाजात गाणी म्हणत. अशी गाणी ऐकतच सरोजिनी मोठी झाली. एक प्रकारे तिला संगीताचा वारसा आईकडून मिळाला.
सरोजिनीच्या संपूर्ण आयुष्याच्या जडणघडणीत तिच्या आई-वडिलांचा मोठा वाटा होता. सरोजिनीला अण्णांचा आणि आईचा अत्यंत अभिमान होता. ती म्हणे,
“आई गंगुबाई मायेचा पदर,
वडील सगळ्या सुखाचे आगर.”
आपल्या समृद्ध बालपणाबद्दल सरोजिनी म्हणते,
काय सांगू बाई, माझ्या माहेराची बढाई
माझ्या पित्याने लावली, वेशीपासून आमराई.
सरोजिनीला दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ होता. भाऊ सर्वांत लहान. त्याचं नाव ‘जवाहर’ असं ठेवण्यात आलं. जवाहरचा जन्म झाल्यावर घरातले सर्वजण खूप आनंदी झाले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. जवाहर आठ-नऊ महिन्यांचा असताना वारंवार आजारी पडू लागला आणि काही दिवसांनी त्याचं निधन झालं. हा संपूर्ण कुटुंबासाठी मोठा मानसिक धक्का होता. जवाहरच्या मृत्यूनंतर गंगुबाईंनी अंथरूण धरलं. त्या वेळी सरोजिनीनं आईला वचन दिलं,
“मी तुला कधीच सोडून जाणार नाही.”
सरोजिनीलाही या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला. मात्र मैत्रिणी आणि शिक्षकांच्या मदतीनं ती पुन्हा अभ्यासाला लागली.
सरोजिनीचा जन्मच शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यामुळे शेत, काळी माती, झाडे, शिवार, मळा, माळरान आणि गोठ्यातील गाई-म्हशी यांच्याबद्दल तिला अत्यंत आत्मीयता होती. तिचं निसर्गाशी दृढ नातं जुळलं होतं.
अण्णांचा गोतावळा खूप मोठा होता. त्यांच्याकडे समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती येत असत. त्यांच्या विविध विषयांवर चर्चा रंगत. या चर्चा ऐकतच सरोजिनी मोठी झाली. अण्णांना इतिहासाची प्रचंड आवड होती आणि इतिहासाचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. इतिहासाचे व्यासंगी असलेले म. म. दत्तो वामन पोतदार हे त्यांचे मित्र होते. या वातावरणात सरोजिनीला इतिहासाची आवड निर्माण झाली.
अण्णा स्वतः लेखकही होते. त्यामुळे त्यांच्या घरी आचार्य अत्रे, कवी गिरीश, कवी यशवंत, अनंत काणेकर, वि. द. घाटे असे अनेक साहित्यिक येत असत. त्यांच्या गप्पा आणि चर्चा सरोजिनीच्या कानावर पडत. त्यामुळे तिला विविध विषयांचं ज्ञान मिळालं आणि तिचा बहुश्रुतपणा वाढला. यातूनच लहानपणापासून सरोजिनीला वाचन, लेखन आणि लोकसाहित्य यांचं वेड लागलं.
अण्णांना मुलींनी नाटक-सिनेमाला जाणं आवडत नसे. सरोजिनीला गाणी म्हणायला आणि नाटकात काम करायला फार आवडत असे; पण अण्णांचा त्याला विरोध होता. खानदानी घरातल्या मुलींनी गाणं आणि नाटक यांच्या वाटेला जाऊ नये, असं त्यांचं मत होतं. मात्र मुलींनी खूप शिकावं, असा त्यांचा आग्रह होता.
एकदा अण्णा सरोजिनीला रियासतकार सरदेसाई यांच्या कामशेत येथील शेतावरील घरी घेऊन गेले. सरदेसाई सरोजिनीला म्हणाले,
“तुम्ही देशासाठी खूप काहीतरी करून दाखविलं पाहिजे. तुमच्या आजीनं ‘सत्यापा’च्या बंडाच्या वेळी सत्यापाला गावातील घरात लपवून ठेवलं होतं. अण्णा तर समाजसेवकच आहेत. त्यामुळे तुम्ही खूप शिकून मोठं व्हा आणि आपल्या देशासाठी काहीतरी करा. ‘आपण मुलगी आहोत, स्त्रीचा जन्म आहे, आपण अबला आहोत,’ असं म्हणायचं नाही. हे सगळं विसरून जायचं.”
हे बोलणं ऐकल्यानंतर सरोजिनीनं उत्तर दिलं,
“होय. मला माझ्या वडिलांनी मुलासारखंच वाढवलं आहे. मी खूप शिकणार आणि अन्यायाविरुद्ध लढा देणार.”
या प्रसंगानंतर सरोजिनीच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला.
अण्णा समाजकारणातही सक्रिय होते. त्यांच्या घरी भूमिगत झालेले क्रांतिकारक रात्री-अपरात्री कधीही येत असत. आपल्याकडे कोण येतं आणि जातं, याबद्दल कुणालाही काही सांगायचं नाही, असं अण्णांनी सरोजिनीला बजावलं होतं. अण्णा कामानिमित्त नेहमी फिरतीवर असत. मात्र, गंगुबाई आणि तिन्ही मुली क्रांतिकारकांची सरबराई करीत. क्रांतिकारक वेश पालटून रात्री-अपरात्री त्यांच्या घरी येत. अशा वेळी गंगुबाई स्वयंपाक करून त्यांना जेवू घालत आणि थोडे पैसे देऊन त्यांची पाठवणी करीत. एकंदरीतच घरात देशप्रेमानं भारलेलं वातावरण होतं.
१९४० साली सरोजिनी उत्तम गुणांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली.
शालेय शिक्षणाच्या काळातच समृद्ध आणि संस्कारक्षम वातावरणामुळं तिच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घातला गेला. आई-वडिलांकडून मिळालेल्या शिकवणीतून तिला इतिहास, लोककला, साहित्य आणि संस्कृती यांची आवड निर्माण झाली. वाचन, लेखन, देशप्रेम आणि सामाजिक जाणिवांचे संस्कारही तिच्यावर झाले.