डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सरोजिनीबाई उच्च शिक्षणासाठी पुण्यात राहायला आल्या. त्यांनी पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला.
महाविद्यालयात असताना सरोजिनीबाईंना प्राध्यापक गुरुवर्य बापूसाहेब माटे यांचा सहवास लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरोजिनीबाईंनी साहित्याचेच नाही तर समाजसेवेचेही धडे गिरवले. अण्णांप्रमाणेच आपणही जमेल तेवढा समाजकार्यात सहभाग घ्यायचा आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घ्यायचा, असं त्यांनी ठरवलं.
पुण्यात राहायला येण्यापूर्वी सरोजिनीबाईंचा बराच काळ सांगली-सातारा परिसरात गेला होता. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात तिथल्या भाषेचं वळण होतं. पुण्याचं वातावरण त्या मानानं अधिक शहरी होतं. पुण्याची भाषा नागरी होती. एकदा महाविद्यालयात एक घटना घडली. वर्गात एक गृहस्थ आले होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देताना सरोजिनीबाईंनी ‘लई’ हा शब्द वापरला. तेव्हा त्या गृहस्थांनी त्यांना नाव विचारलं. सरोजिनीबाईंनी नाव सांगितल्यावर ते म्हणाले,
“मराठ्याची मुलगी मराठी घेऊन पदवी मिळवू शकत नाही. तू गावंढळ दिसतेस.”
हे ऐकून सरोजिनीबाईंना खूप संताप आला. त्यांनी मनाशी ठरवलं की, खूप अभ्यास करून पहिला क्रमांक मिळवून दाखवायचा.
हा प्रसंग घडल्यानंतर सरोजिनीबाई रडत रडतच घरी आल्या. त्यावेळी साताऱ्याचे कर्मवीर भाऊराव पाटील घरी आले होते. त्यांनी सरोजिनीबाईंना विचारलं,
“काय झालं?”
सरोजिनीबाईंनी घडलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला.
त्यावर भाऊराव म्हणाले,
“तू कशाला घाबरतेस? रडणं तुला शोभत नाही. शूर मर्दाच्या लेकीनं त्यांना सरळ विचारायचं, ‘तुम्ही कोण मला विचारणारे?’ साताऱ्याच्या मुलीला हे शोभत नाही.”
अण्णांची एक आठवण सांगत भाऊराव म्हणाले,
“तुला माहीत आहे का, अण्णा म्हसवडला असताना त्यांनी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी होळीला झाडं तोडायची नाहीत, असं लोकांना सांगितलं. त्यामुळे गावातली मुलं त्यांच्याविरुद्ध गेली. लोकांनीही त्यांच्याविरुद्ध बंड पुकारलं आणि दगडफेक सुरू केली. परंतु अण्णा बधले नाहीत.”
“अशा शूर वडिलांची तू मुलगी आहेस, हे विसरू नकोस. त्यामुळे असा गळा काढत बसू नकोस. वेडी आहेस! पुस डोळे आणि लाग अभ्यासाला.”
या दिवसानंतर सरोजिनीबाईंनी अजिबात रडायचं नाही आणि प्रत्येक प्रसंगाला धीटपणे सामोरं जायचं, असं ठरवलं. त्यानंतर त्या आयुष्यभर त्याच निर्धारानं वागल्या.
महाविद्यालयीन जीवनात सरोजिनीबाईंना चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले. पुढे प्रसिद्ध अभिनेते म्हणून नावारूपाला आलेले शरद तळवळकर त्यांच्या वर्गात होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना चरितार्थासाठी काही ना काही काम करावं लागे. त्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसे. अशा वेळी सरोजिनीबाईंनी काढलेल्या नोट्स वाचून ते परीक्षेत उत्तीर्ण होत असत.
याच काळात सरोजिनीबाईंची शांताबाई शेळके यांच्याशीही घट्ट मैत्री झाली. दोघीही महाविद्यालयात काठाच्या पायघोळ साड्या नेसत आणि डोक्यावरून पदर घेत. त्यामुळे त्या इतर विद्यार्थिनींपेक्षा वेगळ्या दिसत असत.
सरोजिनीबाईंनी महाविद्यालयात मराठी आणि संस्कृत हे दोन विषय घेतले. त्यामुळे त्यांच्यावर वाङ्मय मंडळाच्या चिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. या जबाबदारीतून त्या शांताबाई शेळके आणि शरद तळवळकर यांच्या मदतीनं अनेक नामवंत लेखक आणि कवींना व्याख्यानांसाठी महाविद्यालयात आमंत्रित करीत. महाविद्यालयात व्याख्यानांसाठी बोलावण्यात येणाऱ्या लेखक आणि कवींना त्यांना जवळून पाहता आलं. त्यांच्याशी बोलण्याची, तसंच विविध कार्यक्रमांमध्ये भाषण करण्याची संधीही मिळाली. महाविद्यालयात छोटी छोटी भाषणं केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आपोआपच वाढत गेला.
कॉलेजमध्ये असताना एकदा एक गंमत घडली. सरोजिनीबाई आपल्या एका मैत्रिणीबरोबर फिरायला गेल्या होत्या. तेवढ्यात कोणीतरी मोठ्यानं हाक मारली,
“दिवाण-सा s s ब, हिकडं या!”
सरोजिनीबाईंनी त्या दिशेने पाहिलं. एक उंचापुरा, धट्टाकट्टा, सावळा माणूस त्यांना बोलावत होता. त्यांच्या मैत्रिणीनं विचारलं,
“हा कोण?”
त्या माणसानंच उत्तर दिलं,
“मी हिचा कोल्हापूरचा भाऊ आहे. तुम्ही आता जा.”
त्यानंतर तो सरोजिनीबाईंना म्हणाला,
“या मुलीबरोबर फिरू नका. ती चांगली नाही. समजलं ना!”
सरोजिनीबाईंनी त्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्या घराच्या दिशेनं पळत सुटल्या. तो माणूसही त्यांच्या मागोमाग आला. सरोजिनीबाई खूप घाबरल्या. अंगणात आल्यावर अण्णांनी त्या दोघांना पाहिलं आणि ते म्हणाले,
“अक्का, हा गजानन माडगूळकर. चांगली गीतं लिहितो.”
गजानन माडगूळकरांनी सरोजिनीबाईंना खडसावून सांगितलं,
“मी काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं. त्या पोरीबरोबर जायचं नाही.”
अशा दणकेबाज पद्धतीनं सरोजिनीबाई आणि ग. दि. माडगूळकर यांची ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री कायम टिकली.
कॉलेजमध्ये असतानाच आणखी एक गंमत घडली. सरोजिनीबाईंनी ‘पेन फ्रेंडशिप’ नावाची एक गोष्ट लिहिली. या गोष्टीमुळे कॉलेजमध्ये एक प्रेमप्रकरण घडलं. एक मुलगी आपल्या वह्या आणि पुस्तकं सरोजिनीबाईंच्या हातात देऊन कायमची पळून गेली. ती पुन्हा परत आलीच नाही. तिच्या घरच्या लोकांनी सरोजिनीबाईंना अनेक वेळा लहानसहान प्रश्न विचारून भंडावून सोडलं. त्यातच काही दिवसांनी काही मैत्रिणी घरी आल्या. त्यांनी सरोजिनीबाईंच्या आईला विचारलं,
“सरोजिनीचं कुठे काही प्रेमप्रकरण आहे का?”
त्यांनी आईजवळ काही चहाड्याही केल्या. त्या मुली गेल्यावर सरोजिनीबाईंना आईच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली. या सगळ्या प्रकारामुळे त्यांची आई खूप रागावली आणि म्हणाली,
“तुझे कॉलेज आजपासून बंद!”
अशा अनेक गमतीजमती कॉलेजच्या आयुष्यात घडून आल्या.
महात्मा गांधींनी १९४२ साली ‘चले जाव’ आंदोलन सुरू केलं. या चळवळीत अनेक जण सामील झाले. शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी,
‘चरखा चला चला के | लेंगे स्वराज्य लेंगे ||
असं गाणं गात चळवळीत सहभागी झाले. देशभरात एक वेगळंच वातावरण तयार झालं. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तरुण मुलं आणि मुली उत्साहानं पुढे येत होते. सरोजिनीबाईही याला अपवाद नव्हत्या.
महाविद्यालयात असताना इतर मुला-मुलींबरोबर त्यांनी एकदा मोर्चात भाग घेतला. ‘वंदे मातरम्’, ‘चले जाव’, ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दणाणून गेला होता. इतक्यात पोलिसांनी मोर्चावर लाठीमार सुरू केला. काही मुला-मुलींना पोलिसांच्या गाड्यांत कोंबण्यात आलं आणि त्या गाड्या येरवड्याच्या तुरुंगात नेण्यात आल्या. काही तासांनंतर सर्व मुला-मुलींना सोडून देण्यात आलं. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्या तीन-चार वेळा तुरुंगात गेल्या. या सगळ्या धावपळीत त्यांची इंटरची परीक्षा हुकली; पण त्यासाठी त्यांना कोणीही रागावलं नाही.
त्यावेळी पुण्यातील ‘टिळक स्मारक मंदिरा’त सुभाषचंद्र बोस आले होते. माटे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना सुभाषबाबूंचं दर्शन घडवलं. त्यांची भेट झाल्यावर माटे सर म्हणाले,
“देशाच्या भवितव्यासाठी ही माझी मुलं मी तुमच्या स्वाधीन करत आहे.”
सुभाषबाबूंच्या व्यक्तिमत्त्वामुळे सरोजिनीबाई भारावून गेल्या. सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली,
“आम्ही लग्न करणार नाही, ब्रिटिशांची नोकरी करणार नाही आणि देशासाठी आमचं जीवन खर्ची घालू.”
१९४४ मध्ये सरोजिनीबाई उत्तम गुणांनी पदवीधर झाल्या. बी.ए.च्या परीक्षेत सरोजिनीबाई प्रथम आल्या. तरीही काही कारणांमुळे त्यांना सुवर्णपदक मिळू शकत नव्हतं. शेवटी स.प. कॉलेजचे प्राचार्य खाडे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. प्राध्यापक बापूसाहेब माटे यांच्या प्रयत्नांमुळं सरोजिनीबाईंना न. चिं. केळकर यांचं ‘यशोदा चिंतामणी’ पारितोषिक मिळालं.
या पारितोषिक वितरण समारंभाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या वेळी तात्यासाहेब केळकर म्हणाले,
“ही मुलगी लेखिका झाली पाहिजे.”
महामहोपाध्याय पोतदार यांनी सरोजिनीबाईंनी संशोधन करावं आणि पी.एच.डी. मिळवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर साने गुरुजी म्हणाले,
“हिनं लोकगीतांचा आणि लोकसाहित्याचा अभ्यास केला पाहिजे. याविषयी संशोधन केलं पाहिजे.”
या सगळ्या मान्यवरांना सरोजिनीबाईंनी, ‘होय, मी करीन,’ असं उत्तर दिलं.
पुढे त्यांनी बी.टी. केलं आणि ‘शिवाजी मराठा हायस्कूल’मध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. मात्र, सहा महिन्यांतच त्यांनी ती नोकरी सोडली आणि पुणे विद्यापीठात एम.ए. करण्यासाठी प्रवेश घेतला.
एम.ए. करत असताना सोनोपंत दांडेकर त्यांना ज्ञानेश्वरी शिकवत असत. सोनोपंतांच्या विचारांचा सरोजिनीबाईंवर मोठा प्रभाव होता. ते म्हणत,
“तुम्ही फक्त संतवाङ्मयाचा अभ्यास करू नका, तर सर्वसामान्य लोकांत मिसळा. त्यांच्या समस्या ओळखा आणि त्यांना मदत करा.”
सोनोपंतांनी आपल्या विद्यार्थ्यांना पंढरपूर, आळंदी आणि नेवासे येथे नेऊन ज्ञानेश्वरांचं जीवन समजावून दिलं.
साने गुरुजीही म्हणत,
“तुम्ही ज्या समाजात जन्माला आलात, त्या समाजाचं आपण काही देणं लागतो. यासाठी सरोजिनीबाई, तुम्ही या समाजातील लोककाव्य गोळा करा. या लोककाव्यातून समाजातल्या चालीरीती समजतील.”
एम.ए. पूर्ण झाल्यावर त्यांनी पी. एच. डी.साठी अभ्यास सुरू केला. डॉक्टरेटसाठी त्यांनी ‘वनिता सारस्वत’ हा विषय निवडला. मराठी साहित्यामध्ये स्त्री लेखिकांनी दिलेल्या योगदानाचा अभ्यास त्यांनी या प्रबंधात केला. त्यांच्या संशोधनाचे मार्गदर्शक डॉ. वाटवे होते. याशिवाय डॉ. रा. ना. दांडेकर, साने गुरुजी, आचार्य अत्रे आणि न. र. फाटक यांनीही त्यांना मदत केली. या विषयाचा आवाका फार मोठा होता. महानुभाव पंथातल्या पहिल्या लेखिका महदंबेपासून ते सरोजिनीबाईंच्या काळापर्यंत ज्या स्त्रियांनी लेखन केलं, त्या सर्वांच्या साहित्याचा परामर्श त्यांनी आपल्या प्रबंधात घेतला.
त्या काळात सरोजिनीबाई एवढं शिक्षण घेऊ शकल्या याचं मुख्य कारण म्हणजे अण्णांचा भक्कम पाठिंबा. त्या वेळी मराठा समाजात एवढं उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रिया फारशा नव्हत्या. अण्णा सरोजिनीबाईंना म्हणत,
“अक्का, तू आमचा मुलगाच आहेस. तुला हवं तेवढं शिक.”
आपल्या मुलींनी खूप शिकावं, असं अण्णांना वाटत असे. सरोजिनीबाईंनी अण्णांची ही अपेक्षा पूर्ण केली. महामहोपाध्याय पोतदार, साने गुरुजी आणि इतर मान्यवरांनी व्यक्त केलेली अपेक्षाही सरोजिनीबाईंनी डॉक्टरेट मिळवून पूर्ण केली.
महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात सरोजिनीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा मिळाली. प्राध्यापक, साहित्यिक आणि समाजधुरिणांच्या सहवासातून त्यांची साहित्यिक आणि सामाजिक जाणीव समृद्ध झाली.