डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर १९५२ मध्ये देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग आणि समाजकार्य यांमुळे सरोजिनीबाई काँग्रेसच्या संपर्कात आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण त्यांचे स्नेही होते. ते सरोजिनीबाईंना बहीण मानत. यशवंतरावांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरोजिनीबाई, म्हणजेच अक्का, शिराळा-वाळवा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या राहिल्या. त्यांचे वडील अण्णा त्या भागात उपशिक्षणाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या. शिवाय डॉक्टरेट मिळवलेल्या महिला म्हणून अक्कांना निवडणुकीला उभं करावं, असं ठरलं.
निवडणुकीच्या सुरुवातीलाच कोल्हापूरला एका मोडक्या स्टुलावरून पडल्यामुळे अक्कांचा पाय मोडला आणि पायाला प्लास्टर घालावं लागलं. या अवस्थेतही त्यांनी गावोगावी जाऊन प्रचारसभा घेतल्या. एकदा तर प्लास्टर तुटलं. पायाचा त्रास खूप वाढला. सभा संपल्यानंतर रात्री साडेतीन वाजता त्या शिराळ्याला डॉक्टरांकडे गेल्या.
त्यांच्या विरोधात त्यांच्याच वर्गात शिकलेला एक मुलगा आणि नात्यातलीच दुसरी एक व्यक्ती निवडणुकीला उभी होती. व्याख्यान देणं अक्कांना सहज जमत असे. त्यांचा अभ्यासही चांगला असल्यामुळे त्यांची भाषणं प्रभावी होत. शिकलेली आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेली स्त्री म्हणून लोकांना त्यांच्याबद्दल विशेष कौतुक होतं. शिवाय अण्णांच्या त्या भागात अनेक ओळखी होत्या. या सगळ्याचा फायदा सरोजिनीबाईंना झाला आणि त्या निवडणुकीत विजयी झाल्या.
त्या काळात प्रचारसभा रात्री होत असत. अक्कांच्या प्रचारासाठी भाऊसाहेब हिरे, डॉक्टर नरवणे, मोरारजी देसाई आणि सांगलीचे वसंतदादा यांसारखे अनेक मान्यवर येत. मात्र त्या भागात महिलांनी सभेला जाण्याची प्रथा नसल्यामुळे सभांना स्त्रिया फारशा येत नसत.
निवडून आल्यानंतर अक्का बापूसाहेब माटे यांना भेटायला गेल्या. माटे सरांनी अक्कांना सांगितलं,
“आता मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतःला वाहून घे. विधानसभेत त्यासाठी आवाज उठव.”
एक साधी, सरळ मराठी मुलगी आमदार म्हणून निवडून आली. सरोजिनीबाई १९५२ ते १९५७ या कार्यकाळासाठी मुंबई प्रांताच्या विधानसभेच्या सदस्य झाल्या.
निवडणुकीत विजयी झाल्यावर अक्कांच्या आजीनं त्यांची दृष्ट काढली. त्यानंतर घरातील सर्व मंडळी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेली. सोलापूरचे कलेक्टर शंकरराव मोहिते यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, सरोजिनीबाईंना न विचारताच त्यांनी सोलापूरमध्ये त्यांचं भाषण ठरवलं. अक्कांना उगाचच भाषणाला उभं राहण्याचा कंटाळा आला. तेव्हा अण्णा त्यांना म्हणाले,
“सरोजिनी, आता तुला असा कंटाळा करून चालणार नाही. लोकांनी तुला निवडून दिलं आहे. त्यामुळे लोकांची सेवा करणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यांच्या तक्रारी व समस्या सोडवणं हे तुझं कर्तव्य आहे. तू आता समाजसेवेला वाहून घेतलं आहेस. त्यामुळे तुझा वेळ लोकांसाठीच आहे. तुला स्वतःचं असं खाजगी आयुष्य नाही, हे लक्षात ठेव.”
आमदारकीची शपथ घेण्यासाठी त्या पुण्याहून मुंबईला आल्या. त्या काळात मोटारी फार कमी होत्या. बहुतेक जण आगगाडीनं प्रवास करीत. सरोजिनीबाई आणि मालतीबाई शिरोळे पुण्याहून डेक्कन क्वीननं मुंबईला आल्या.
शपथविधी झाल्यानंतर सांगली-साताऱ्याकडील आमदारांना यशवंतराव चव्हाणांनी आपल्या घरी जेवायला बोलावलं. तेव्हापासून वेणूताई आणि यशवंतरावांचं घर हे सरोजिनीबाईंचं मुंबईतलं घरच झालं. वेणूताई आणि सरोजिनीबाई यांच्यातही जवळिकीचं नातं निर्माण झालं. अर्थात, इतर आमदारांप्रमाणेच मुंबईला आल्यावर सरोजिनीबाई आमदारगृहातच उतरत असत. मुंबईत मालतीबाई शिरोळे, भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब देसाई, जयंतराव टिळक आणि वसंतदादा यांसारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
आमदार झाल्यानंतर लोक अक्कांकडे वेगवेगळ्या मागण्या घेऊन येऊ लागले. त्यांना काय उत्तर द्यावं, त्यांच्याशी कसं बोलावं, हे सुरुवातीला अक्कांना कळत नसे. अशा वेळी यशवंतराव चव्हाण त्यांना वारंवार धीर देत आणि मार्गदर्शन करीत. त्या काळातलं राजकीय वातावरणही खेळीमेळीचं होतं. सर्वजण एकमेकांना मदत करीत. त्यांच्यात घरगुती जिव्हाळा होता. सरोजिनीबाई वयानं लहान होत्या आणि कृष्णरावांच्या कन्या होत्या. त्यामुळे इतर मंडळी त्यांना सांभाळून घेत असत.
त्या काळात विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पुण्याला होत असे. एकदा अक्कांना अधिवेशनात भाषण करायचं होतं. त्यासाठी त्यांनी ‘शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य’ हा विषय निवडला. लोकसाहित्याच्या संशोधनासाठी त्या खेडोपाडी फिरल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातल्या परिस्थितीची त्यांना चांगली जाणीव होती. खेड्यांमध्ये मुलींच्या शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. मुलींनी शिकून काय करायचं, असा विचार प्रचलित होता. त्याचबरोबर खेड्यापाड्यांत चांगले डॉक्टर आणि औषधोपचारांच्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. आमदार या नात्यानं मुलींचं शिक्षण आणि ग्रामीण आरोग्यसेवा यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं अक्कांना वाटत होतं.
तसंच डॉक्टरेट करताना ‘वनिता सारस्वत’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यामुळे स्त्रीजीवन, स्त्रीशिक्षण आणि स्त्रियांचं लेखन यांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता.
या अभ्यासाचा उपयोग त्यांनी आपल्या भाषणात केला. स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत असलेल्या त्रुटी त्यांना अस्वस्थ करीत. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा त्या हा विषय सभागृहात मांडत असत.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही त्या तितक्याच पोटतिडकीनं मांडत. खेड्यांतील स्त्रियांना नदीवरून पाणी आणावं लागतं, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं. कळशीनं पाणी भरणं आणि ते घरापर्यंत आणणं हे वेळखाऊ आणि कष्टाचं काम होतं. स्त्रियांचे हे कष्ट कमी व्हावेत यासाठी घरोघरी नळानं पाणी पोहोचलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांचे अनुभव आणि अभ्यास या दोन्हींच्या आधारे त्या विधानसभेत या प्रश्नांना सातत्यानं वाचा फोडत असत.
खेड्यातील काही स्त्रिया मात्र त्यांना म्हणत,
“मुली म्हणजे परक्याचं धन. त्यांना शिक्षण कशाला हवं? त्यांना शाळेत पाठवलं तर घरातली कामं कोण करणार? शेवटी ग-म-भ-न शिकून संसारच करायचा आहे. शिवाय मुलगी शिकली की डोईजड होते. शिकलेल्या मुलीचं लग्न होणंही कठीण असतं.”
अशी बोलणी ऐकली की अक्कांना निराशा यायची. त्या मनात विचार करीत,
‘मी एवढा खटाटोप कशासाठी करते आहे? ज्यांच्यासाठी हे सगळं करते, त्यांनाच मुलींना शिकवायचं नाही. मग मला कोणी सांगितला हा नसता उद्योग?’
खेड्यातील लोकांचं बोलणं ऐकून अक्कांना नैराश्य येत असे. अण्णा मात्र त्यांना धीर देत असत.
एकदा सरोजिनीबाईंच्या एका मामेभावानं त्यांना समजावलं,
“तू थोडं दमानं घे. खेडेगावातली माणसं शिकलेली नसली तरी त्यांना अनुभव आहे. अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. त्यामुळे तू सारखं सारखं तुझंच म्हणणं सांगू नकोस. इथली लोकं म्हणतात,
“तुमच्या अक्कांनी प्रवचन करावं, अभंग म्हणावा. आम्ही टाळ-मृदंग वाजवू. मग कीर्तन रंगतं की नाही ते बघा! तू इथल्या लोकांचं मानसशास्त्र समजून घे आणि त्याप्रमाणं वाग.”
या बोलण्याची आठवण करून देणारा एक प्रसंग घडला. सरोजिनीबाई आणि मालतीबाई शिक्षणप्रसाराच्या कामाचा एक भाग म्हणून एका हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. तिथे अनेक मोलकरणी जमल्या होत्या. अक्कांना वाटलं, या स्त्रियांना ग्रहण कसं लागतं, हे समजावून सांगावं. त्यासाठी त्यांनी एका स्त्रीला सूर्य, दुसरीला चंद्र आणि तिसरीला पृथ्वी मानून प्रात्यक्षिकातून समजावायला सुरुवात केली. तेवढ्यात एक बाई जोरात ओरडली,
“आम्हाला कशाला हे शिकवता? आम्हाला दिवस कसा उगवतो आणि मावळतो, हेही कळत नाही. तुम्ही कशाला आम्हाला शिकवायला येता? जा, तुमच्या घरी!”
हे ऐकून सरोजिनीबाईंना त्यांच्या मामेभावानं दिलेल्या सल्ल्याची आठवण झाली.
आमदार असताना आणखी एक वेगळा अनुभव त्यांना आला. भाद्रपद महिन्यात महालक्ष्मीची आरास कोणाची चांगली, याची स्पर्धा आयोजित केली होती. लोकांच्या घरी आरास पाहण्यासाठी सरोजिनीबाई, मालतीबाई शिरोळे आणि लीला मर्चंट गेल्या होत्या. फिरता फिरता त्यांना वेश्यांच्या वस्तीतही जाण्याचा प्रसंग आला. त्या तिघी तिथे गेल्या आणि त्यांना सुखद आश्चर्य वाटलं. अंगणापासूनच प्रसन्न वातावरण होतं. सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. जिन्यावर गौरीची पावलं उमटवली होती आणि देखणे मुखवटे असलेल्या गौरी बसवल्या होत्या. बाजूला फराळाची ताटं मांडली होती. उंच उंच समया लावल्या होत्या आणि सर्वत्र उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. हा मनमोहक देखावा पाहून सरोजिनीबाई उत्स्फूर्तपणे म्हणाल्या,
“यांनाच पहिला नंबर देऊ या!”
मात्र, वेश्यांना बक्षीस स्वीकारण्यासाठी निमंत्रण दिल्यानंतर धर्ममार्तंडांनी मोठा गदारोळ केला.
यावर सरोजिनीबाई म्हणतात,
“डोंबारी, वेश्या, वासुदेव ही माणसं नाहीत का? कलावंतांना जात-धर्म नसावा. आपण त्यांच्याकडे मत मागायला जातो, मग इतर वेळी त्यांना आदर द्यायला नको का?”
अशा होत्या सरोजिनीबाई!
एकदा एका गावात अक्कांनी भाषण दिलं. भाषण संपल्यावर एक तेजस्वी, काळीसावळी स्त्री त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली,
“चला माझ्या घरी. चहा-पाणी घ्या आणि मग जा.”
अक्का म्हणाल्या,
“अगं, आताच तर चहा-पाणी झालं आहे.”
पण ती बाई ऐकायला तयार नव्हती. शेवटी अक्का आणि मालतीबाई तिच्या घरी जायला निघाल्या. त्यांनी विचारलं,
“कुठे आहे तुमचं घर?”
त्या बाईनं लांब हात करून सांगितलं,
“या रानापलीकडे आहे.”
हे ऐकून अक्का आणि मालतीबाई जरा हबकल्या. अक्कांचा पाय अधू होता आणि मालतीबाईही वयस्कर होत्या. एवढं लांब कसं जायचं, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांचं मन ओळखून ती बाई म्हणाली,
“चला, बाजूलाच माझी गाडी उभी आहे. त्यात बसा.”
सरोजिनीबाई आजूबाजूला ड्रायव्हर कुठे आहे, हे शोधू लागल्या. तेव्हा ती बाई म्हणाली,
“ड्रायव्हर कुठला? मीच गाडी चालवते!”
एवढं बोलून ती झटकन जीपमध्ये चढली. अक्का आणि मालतीबाईही तिच्या मागोमाग जीपमध्ये बसल्या.
त्या बाईनं सराईतपणे जीप वळवली आणि शेतापर्यंत नेली. वाटेत ती आपली कहाणी सांगू लागली,
“माझे यजमान काही वर्षांपूर्वी वारले. भाऊबंदकी होती. दीर जमीन मागायला लागला. मी त्याला सांगितलं, ‘माझ्या पदरात चार कच्चीबच्ची आहेत. मी तुला जमीन देणार नाही.’ मग मी कोर्टात गेले आणि जमीन माझ्या नावावर करून घेतली. आता सगळं मीच करते. नांगर धरते, पिकाला पाणी देते, तण काढते, धान्य गोळा करते आणि ट्रॅक्टरही चालवते. हिंमत धरली आणि सगळं करून दाखवलं. मोठा मुलगा मॅट्रिकला आहे. त्याला पुण्याला शिकायला पाठवलं. दुसरी मुलगी आठवीत आहे आणि उरलेली दोघं पहिली-दुसरीत आहेत.”
या कर्तृत्ववान स्त्रीची ओळख झाल्यावर अक्कांना स्वतःबद्दल विचार करावासा वाटला. त्या मनात म्हणाल्या,
‘आपण काय केलं? आपण फक्त आमदार आहोत. पण आपल्याला जीप चालवता येते का? आपण पुस्तकातलं खूप शिकलो; पण या बाईची सर आपल्याला येणार नाही. तिच्यासारखी हिंमत आपल्यात नाही. आपण आपल्या आयुष्यात काय मिळवून दाखवलं? या बाईनं आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत आपल्या मुलांना मोठं केलं आहे. असं आपल्याला कधी जमेल?’
गावातील लोक अण्णांना खूप आदर देत असत. त्यांना वाटायचं, हा माणूस आपल्यासारखाच आहे. शेतावर जातो, घराचं छप्पर शाकारतो, चटणी-भाकर खातो आणि आपुलकीनं बोलतो. त्यामुळे लोक त्यांचं म्हणणं ऐकत. अण्णाही लोकांचं मानसशास्त्र समजून घेऊन त्यांच्याशी बोलत असत. त्यांच्या या स्वभावाचा फायदा अक्कांनाही झाला.
भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. सरकार रस्ते, शाळा, वीज, शिक्षण, नद्या आणि तलावांमधील गाळ काढणं, आरोग्य अशा विविध प्रश्नांवर चर्चा करीत होतं. लोकांना प्राथमिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार आपल्या परीनं प्रयत्न करीत होतं. मात्र, अक्कांना वाटत होतं की वासुदेव, गोंधळी, गायक, वादक, कडकलक्ष्मी, तमासगीर आणि शाहीर यांचाही विचार झाला पाहिजे. त्यांनी हा विषय सभागृहात मांडला की इतर आमदार त्याची थट्टा करीत. पण गावातील बारा बलुतेदार आणि लोककलावंतांसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं अक्कांना मनापासून वाटत असे. त्यासाठी त्या सातत्यानं प्रयत्न करीत.
याच काळात अक्कांची पुणे आकाशवाणी केंद्राच्या सल्लागार समितीवर नियुक्ती झाली. गोविंदराव टेंबे यांनी त्यांना आकाशवाणीवर सादर होणाऱ्या कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी दिली. त्यानंतर आकाशवाणीवर ओव्या, झिम्मा आणि इतर लोकगीतांचे कार्यक्रम सुरू झाले. एका अर्थानं गावातील लोकांना आपली कला इतरांसमोर सादर करण्याची संधी मिळाली. अक्कांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. त्या खेड्यापाड्यांतील स्त्रियांना घेऊन आकाशवाणीवर लोकसंगीताचे कार्यक्रम सादर करीत असत.
सरकारनं सरोजिनीबाईंची ‘नाट्य परीक्षण मंडळा’वर नियुक्ती केली. त्यामुळे त्यांचा तमासगीरांशीही संबंध आला. यावरून समाजात मोठं वादळ उठलं. लोक घरी येऊन गंगुबाईंना सांगू लागले,
“तुमची मुलगी आता तमाशातही जाऊ लागली आहे. तिनं अगदी ताळतंत्र सोडलं आहे.”
यावरून गंगुबाई त्यांच्यावर खूप रागावल्या. पण अण्णा मात्र म्हणत,
“तमासगीर हेही कलाकार आहेत. त्यांच्या सुखसोयींकडे सरोजिनीनं लक्ष द्यायलाच हवं. कारण तिनं ते काम स्वीकारलं आहे.”
एकदा सरोजिनीबाई तमाशा परिषदेला गेल्या होत्या. तिथे एक गंमतच घडली. गण-गौळण झाल्यावर चार-पाच जणी आपले भरजरी शालूंचे पदर फडकावत व्यासपीठावर आल्या. त्यांच्यापैकी एकीनं सरोजिनीबाईंना पाहिलं. तिनं पायांतील चाळ काढले आणि थेट व्यासपीठावरून खाली आली. तिनं सरोजिनीबाईंना कडकडून मिठी मारली. सर्वजण हे दृश्य पाहत होते. या दोघींची ओळख कशी, नेमकं काय घडलं, असे प्रश्न प्रेक्षकांना पडले.
इतक्यात अण्णा पुढे आले. त्यांनी त्या बाईची चौकशी केली. तिनं डोक्यावरचा पदर सारखा केला, अण्णांच्या पाया पडली आणि म्हणाली,
“मी बकुळा. इस्लामपूरला तुमच्या शेजारी राहत होते. ओळखलं नाहीत का मला? मी मात्र अक्कांना ताबडतोब ओळखलं. त्यांना पाहिल्यावर मला राहवलं नाही आणि म्हणून स्टेजवरून खाली आले.”
अण्णा आणि सरोजिनीबाई कोणालाही कमी दर्जाचं समजत नसत. त्यांच्या दृष्टीनं सर्व माणसं सारखीच होती. ते तमासगीर असोत किंवा आणखी कोणी. कलावंतांची जात-पात, देवधर्म, राहणीमान किंवा दिसणं यांवरून त्यांच्याबद्दल मत बनवायचं नाही, अशी त्यांची धारणा होती. कलावंत हा कलावंतच असतो आणि त्याला मानानेच वागवलं पाहिजे, असं अक्का आणि अण्णा मानत. मात्र, गंगुबाईंना त्यांचे हे विचार मान्य नव्हते.
त्या काळाच्या मानानं अण्णा अत्यंत पुरोगामी विचारांचे होते. जात-पात, धर्म अशा भेदांना ते महत्त्व देत नसत. हेच संस्कार त्यांनी सरोजिनीबाईंवर लहानपणापासून केले होते. त्यामुळे सरोजिनीबाईंना कोणीही भेटायला येत असे आणि आपल्या समस्या सांगत असे. अक्कांनाही सर्वांना भेटायला आवडे. कारण अशा अठरापगड लोकांकडून त्यांना लोकगीते गोळा करायची होती. लोकपरंपरा एकत्र करून त्यांचं संकलन आणि संपादन करायचं होतं. बहुतेक सर्व कलावंत आपली संस्कृती आणि परंपरा जपत होते. त्यांचं हे काम लाखमोलाचं होतं. त्यासाठी त्यांना आदर देणं महत्त्वाचं आहे, असं अक्कांना वाटत असे.
सरोजिनीबाई वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं खेडोपाडी जात असत. तिथे लोकांना भेटत, त्यांच्याशी बोलत आणि त्यांच्या समस्या समजून घेत. कधी गावात सभा भरवली जाई. अशा वेळी अक्का सर्वांसमोर व्याख्यान देत. गावातील बायकाही त्यांचं भाषण ऐकायला येत असत.
सरोजिनीबाई पायघोळ, जरीकाठाची साडी नेसत. डोक्यावर पदर असे. कपाळावर ठसठशीत कुंकू आणि हातात काचेच्या बांगड्या असत. भाषणासाठी उभ्या राहिल्यावर त्या प्रथम सर्वांना नमस्कार करीत. त्यांच्या या आदबीच्या वागण्याचं लोकांना खूप कौतुक वाटे. आपल्या चालण्या-बोलण्यानं त्या लोकांची मनं जिंकून घेत.
एकदा अशीच गंमत झाली. अक्का व्यासपीठावर चढताच एक वयस्कर बाई त्यांना म्हणाली,
“आमदार, पावन टपकाळ बोलावं!”
सरोजिनीबाईंना ‘टपकाळ’ म्हणजे काय, हे समजलं नाही. जवळच असलेल्या एका माणसानं त्यांना सांगितलं,
“टपकाळ म्हणजे ‘टू द पॉइंट.’ अघळपघळ भाषण नको. नेमकं बोला. जेवढ्यास तेवढं बोला.”
त्या वेळी ऐंशी वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या त्या बाईला अक्कांनी व्यासपीठावरून खाली उतरून नमस्कार केला. तेव्हा त्या बाईनं सरोजिनीबाईंच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि आपली बोटं त्यांच्या कानशिलावर मोडली. ‘औक्षवंत हो,’ असा आशीर्वाद दिला. नंतर म्हणाली,
“रेडिओवरती तुझी गाणी ऐकते. खूप गोड वाटतं.”
असे अनुभव सरोजिनीबाईंना अनेक ठिकाणी येत असत.
सरोजिनीबाई म्हणत,
“खेड्यात गेलं की मराठीतील अस्सल मराठमोळे शब्द कानी पडतात आणि आपलं शब्दभांडार वाढतं. आपल्या इथे तर दर काही मैलांवर बोलीभाषा बदलते. या बोलीभाषेची गोडी काही न्यारीच आहे.”
एकदा आरोग्यमंत्री नामदार शांतीलाल शहा आणि नामदार यशवंतराव चव्हाण यांनी सरोजिनीबाईंना जे. जे. रुग्णालयात पाय दाखवण्यासाठी घेऊन जायचं ठरवलं. लहानपणापासून पोलिओमुळे त्यांचा पाय अधू होता. त्यावर उपचार करता येतील का, हे पाहायचं होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिष्टमंडळातील एका प्रमुख डॉक्टरांना त्यांचा पाय तपासण्यासाठी बोलावलं. त्या डॉक्टरांनी वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांचा पाय हलवून पाहिला. त्यामुळे पायाचा त्रास आणखी वाढला. सरोजिनीबाईंना चालताही येईना. म्हणून त्यांनी पुण्याला घरी जाण्याचं ठरवलं. त्या एकट्या प्रवास करीत नसत. त्यांना सोबत कोणीतरी लागे. पाय खूप दुखत असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर पुण्याला जायचं होतं.
पण वसंतदादा म्हणाले,
“देशाची बांधिलकी आधी. उद्या एका बिनसरकारी ठरावावर तुम्हाला सभागृहात बोलायचं आहे. मग जा पुण्याला.”
हा ठराव एका गुजराती व्यक्तीनं सभागृहात मांडला होता. त्यानुसार, साक्षरतेचं प्रमाणपत्र असल्याशिवाय मुंबईत कोणत्याही मराठी माणसाला हमालीसुद्धा करता येऊ नये, अशी तरतूद होती. हा मराठी माणसावर मोठा अन्याय होता. सरोजिनीबाईंसह आठ-दहा जणांनी या ठरावाला विरोध केला. अखेर तो मागे घेण्यात आला. मराठी माणसावर होणारा अन्याय सरोजिनीबाईंना कधीही सहन होत नसे.