डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
१९६८ मध्ये सरोजिनीबाई राज्यसभेच्या सदस्या झाल्या. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी यशवंतरावांनी त्यांना निवडणुकीला उभं राहण्याचा आग्रह केला. बाळ रानडे कागद आणि पेन घेऊन तयारच उभे होते. ते म्हणाले,
“सही करा उमेदवारी अर्जावर.”
वसंतदादा पाटीलही रागावून म्हणाले,
“आयती संधी चालून आली आहे, तर नकारघंटा का वाजवतेस?”
अखेर सरोजिनीबाईंनी उमेदवारी अर्ज भरला.
निवडणुकीच्या दिवशी एक गंमतच झाली. मतदानाची वेळ संपायला दहा-पंधरा मिनिटं उरली होती; पण बारा-तेरा मतदारांचा पत्ताच नव्हता. शेवटी वसंतदादांनी सर्वांना फोन केले. त्यानंतर ते मतदार आले आणि त्यांनी मतदान केलं. अशा प्रकारे सरोजिनीबाई निवडून आल्या.
दिल्लीत सरोजिनीबाईंना यशवंतराव चव्हाण यांची बहीण म्हणून सर्वजण ओळखत असत. त्या लेखिका असल्यामुळे इंदिरा गांधीही त्यांच्याशी नेहमी बोलत असत. नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांनी सरोजिनीबाईंना मराठी संस्कृतीविषयी नॅशनल बुक ट्रस्टसाठी पुस्तक लिहायला सांगितलं. या पुस्तकाच्या संदर्भात त्या संसदेच्या ग्रंथालयात वारंवार जात असत. त्यामुळे त्यांचं वेगळेपण सर्वांच्या लक्षात येऊ लागलं.
सरोजिनीबाईंनी नॅशनल बुक ट्रस्टसाठी ‘महाराष्ट्र लोकसाहित्य व संस्कृती’ हे पुस्तक लिहिलं. नंतर या पुस्तकाचं देशातल्या विविध भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यामुळे सरोजिनीबाईंचं नाव देशभर पसरलं. राज्यसभेतही त्यांची ओळख एक अभ्यासू लेखिका म्हणून झाली.
सरोजिनीबाईंनी राज्यसभेतील आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. परराज्यांतील आणि परदेशांतील लोकांसमोर मराठी संस्कृती व परंपरा यांविषयी त्या भाषणांतून आणि लेखनातून माहिती देत असत. मराठी लोकसाहित्य लोकांसमोर आणण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. खासदार असताना त्यांना मिलिटरी कॉलेज आणि टेल्कोसारखे काही कारखाने पाहण्याची संधीही मिळाली.
राज्यसभेत सरोजिनीबाईंची अनेक संस्थानिकांशी ओळख झाली. स्वातंत्र्यानंतर त्यांची संस्थानं खालसा झाली होती; तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यात, आदबीत आणि सुसंस्कृतपणात त्यांचं वेगळेपण जाणवत असे.
सरोजिनीबाई वयानं सर्वांत लहान होत्या. शिवाय, अण्णांचे बहुतेक सर्व प्रतिष्ठित व्यक्तींशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे सर्वांचा सरोजिनीबाईंवर अत्यंत विश्वास होता. एकदा त्या दिल्लीला गेल्या असताना महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारही तिथं होते. मात्र त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. ते म्हणाले,
“मला ताबडतोब पुण्याला जायचं आहे. त्यासाठी सरोजिनीला बोलावून आणा.”
त्या वेळी सरोजिनीबाई एका स्नेह्यांकडे राहायला गेल्या होत्या. दादांचे सचिव श्री. डोंगरे त्यांना शोधत तिथं आले. ते म्हणाले,
“दादांना ताबडतोब पुण्याला जायचं आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही असावं, अशी त्यांची इच्छा आहे.”
सरोजिनीबाई म्हणाल्या,
“मला पार्लमेंटमध्ये जाऊन सही करायला हवी. मग मी येते.”
पण दादांना धीर नव्हता. त्यांनी सरोजिनीबाईंना रागावून विचारलं,
“माझं महत्त्व जास्त की पार्लमेंटचं? आपण ताबडतोब विमानानं मुंबईला जाऊ.”
दिल्लीहून विमान वेळेवर निघालं; पण ते मुंबई विमानतळावर उतरेना. तेव्हा सरोजिनीबाईंना काळजी वाटू लागली. विमान पुन्हा दिल्लीला तर जाणार नाही ना, अशी शंका त्यांच्या मनात आली. अखेर विमान मुंबई विमानतळावर उतरलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.
सरोजिनीबाई अत्यंत साध्या आणि सरळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या भिडस्त स्वभावाचा अनेक लोक फायदा घेत असत. काही वेळा त्यांना कार्यक्रमाला बोलावलं जाई; पण तिथं चहा-पाण्याचीही व्यवस्था नसे. कधी येण्या-जाण्याचा खर्चही दिला जात नसे.
खासदार झाल्यावर त्यांना रेल्वेच्या पहिल्या वर्गाचं भाडं मिळत असे. पाय अधू असल्यामुळे प्रवासात त्यांच्याबरोबर कोणीतरी असणं आवश्यक होतं. त्यामुळे त्या लोकसाहित्य समितीच्या सचिवांना आपल्याबरोबर नेत असत. त्यांच्यासाठीही त्या स्वतःच्या पैशानं पहिल्या वर्गाचं तिकीट काढत. अशा स्वभावामुळे सरोजिनीबाईंना अनेकदा स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागे. खासदार असताना दिल्लीतही त्यांना अशी पदरमोड करावी लागत असे. घरीसुद्धा आठ-दहा माणसं जेवायला किंवा नाश्त्याला येत असत. त्यांचा सर्व खर्च सरोजिनीबाईंनाच करावा लागे.
खासदार असताना एकदा त्या पंजाबच्या राज्यपालांच्या पाहुण्या म्हणून गेल्या होत्या. सतलज नदीवर बांधलेलं धरण पाहण्यासाठी राज्यपालांनी त्यांना जीपमधून नेलं. एवढं मोठं आणि महाकाय धरण पाहून सरोजिनीबाई अचंबित झाल्या. तेथेच त्यांनी एक कविता केली. त्या वेळी पंजाबचे राज्यपाल पावटे साहेब होते. ते पुण्यात शिक्षण खात्याचे संचालक असताना सरोजिनीबाईंची त्यांच्याशी ओळख झाली होती.
सभागृहात एखाद्या मुद्द्यावरून दोन प्रमुख नेत्यांमध्ये वाद होत असत किंवा त्यांची मतं जुळत नसत. मग त्यांच्यात अबोला आणि धुसफूस निर्माण होई. अशा वेळी अक्काताई मध्ये पडत आणि त्यांच्यात समेट घडवून आणत. अक्काताईंचे सर्वांशीच चांगले संबंध असल्यामुळे दोन्ही बाजूंचे लोक त्यांचं म्हणणं ऐकत. त्यांची सर्वांशी मैत्री होती. त्या खऱ्या अर्थानं जगमित्र होत्या.
त्यांच्या या स्वभावाचं कारणही स्पष्ट होतं. त्या कोणाकडून काहीही मागत नसत. अण्णांनी लहानपणापासून त्यांच्यावर असे संस्कार केले होते की, त्यांचा आधार त्यांना आयुष्यभर मिळाला. ‘मनाची श्रीमंती सर्वांत मोठी’ हा विचार त्यांच्या मनावर बिंबला होता. त्यामुळे त्या पैशाच्या श्रीमंतीच्या मागे कधीच लागल्या नाहीत.
यशवंतराव चव्हाण यांचेही अधूनमधून कोणाशी तरी खटके उडत असत. अशा वेळी सरोजिनीबाई मध्ये पडून समेट घडवून आणत. त्यावर यशवंतराव म्हणत,
“अक्काताई तोंडी लावायला असली की बरं असतं. ती बोलू शकते दाबून. आम्हाला गप्प बसणं भाग असतं.”
सरोजिनीबाईंना पैसा किंवा दागदागिन्यांची हाव नव्हती. मात्र त्यांना चांगल्या साड्या नेसायची खूप आवड होती. खादी भांडारात जाऊन छान काठापदराच्या साड्या आणाव्यात आणि नेसाव्यात, असा त्यांचा शौक होता. पायघोळ साडी आणि डोक्यावर पदर यामुळे त्या खानदानी दिसत असत.
एकदा सरोजिनीबाई डॉ. इरावती कर्वे यांच्याबरोबर डेक्कन कॉलेजच्या आवारात फिरत होत्या. त्या दिवशी त्यांनी पांढरी रेशमी साडी नेसली होती. ती सारखी सावरावी लागत होती. हे पाहून इरावतीबाई त्यांना म्हणाल्या,
“सरोजिनी, तुमची आई जशा लांबरुंद इरकली साड्या नेसते, तशा तुम्ही नेसत जा. त्या अंगभर दिसतात. रंगीत असल्यामुळे मळतही नाहीत आणि भारदस्त दिसतात. तेच आपल्याला शोभून दिसतं.”
सरोजिनीबाई भोळ्या-भाबड्या आणि लाघवी होत्या. त्याचबरोबर त्या स्वाभिमानी, भावनाप्रधान आणि कष्टाळूही होत्या. त्यांची कोणाशीही सहज ओळख होई आणि मैत्री जुळे. त्यामुळे त्या कुठेही गेल्या तरी कोणी ना कोणी त्यांना भेटत असे आणि काहीतरी काम सांगत असे. भिडस्त स्वभावामुळे त्या स्वतःच्या हातातलं काम बाजूला ठेवून त्या व्यक्तीचं काम करून देत. त्यांच्या या स्वभावामुळे विरोधी पक्षातील लोकांशीही त्यांचे चांगले संबंध होते.
निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या बाहेरगावी गेल्या असोत किंवा लोकसाहित्य आणि लोकसंगीत गोळा करण्यासाठी खेडोपाडी फिरत असोत, त्यांचं काम मार्गी लागत असे. कोणतीही समस्या उद्भवली तरी कुणीतरी ओळखीची व्यक्ती भेटत असे आणि त्या समस्येवर तोडगा निघत असे.
खासदार असतानाची ही एक गंमत. एकदा सरोजिनीबाईंना वाटलं की, आपला धीटपणा दिल्लीमध्येही दाखवावा. त्या संसद भवनातून खाली उतरल्या आणि त्यांनी एक टॅक्सी बोलावली. टॅक्सीत बसल्यावर त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं,
“नॉर्थ ॲव्हेन्यू चलो!”
ड्रायव्हरनं एकदा मागे वळून पाहिलं आणि गाडी सुरू केली. गाडीनं वेग घेतला. मात्र, नेहमीचा रस्ता सोडून तो वेगवेगळ्या रस्त्यानी गाडी नेऊ लागला. सरोजिनीबाईंना भीती वाटू लागली. त्यांनी पुन्हा एकदा रागानं सांगितलं,
“मुझे नॉर्थ ॲव्हेन्यू जाना है!”
मनातून मात्र त्या घाबरल्या होत्या. त्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या, गळ्यात सोन्याची साखळी आणि बोटात पाचूची अंगठी होती. पर्समध्ये चार-पाचशे रुपये होते. दिल्लीतील तो भाग त्यांना परिचित नव्हता. त्यामुळे त्या काळजीत पडल्या.
शेवटी त्या ड्रायव्हरला म्हणाल्या,
“मैं एम. पी. हूँ!”
ड्रायव्हर घाबरेल, असं त्यांना वाटलं. पण तसं काही झालं नाही. उलट तो म्हणाला,
“दिल्ली में बहुत एम. पी. रहते हैं!”
असं म्हणून त्यानं गाडी आणखी वेगानं पळवली. अखेर त्यानं नॉर्थ ॲव्हेन्यूला आणून गाडी उभी केली. परिचित भाग आल्यामुळे सरोजिनीबाई चटकन खाली उतरल्या आणि ड्रायव्हरला पैसे देऊ लागल्या. तेवढ्यात ड्रायव्हरही टॅक्सीतून खाली उतरला आणि म्हणाला,
“क्या आपने मुझे पहचाना नहीं? एक कलाकार कभी दूसरे कलाकार से पैसा लेता है, बहनजी?”
सरोजिनीबाईंनी त्याला ओळखलं नव्हतं. तेव्हा तो म्हणाला,
“पहचाना नहीं? मैं जयपाल हूँ. आप मराठी लोकगीत गाती थीं और मैं मुंबई में ढोलक बजाता था. भूल गईं?”
एवढी ओळख दिल्यावर सरोजिनीबाईंनी त्याला ओळखलं. मग त्यांनी विचारलं,
“आप यहाँ कैसे?”
ड्रायव्हर म्हणाला,
“आपको सब बताऊँगा. चलो, कॉफी पिएँगे.”
सरोजिनीबाई पुन्हा टॅक्सीत बसल्या आणि दोघे एका हॉटेलमध्ये गेले. मात्र, नॉर्थ ॲव्हेन्यूमधील लोकांनी त्या दोघांना टॅक्सीतून जाताना पाहिलं. त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांची गाडीही टॅक्सीच्या मागोमाग आली. तो टॅक्सीवाला सरोजिनीबाईंना पळवून नेत आहे, असं पोलिसांना वाटलं होतं. अखेर सरोजिनीबाईंनी सर्व हकीकत सांगितली. तेव्हा सगळेच हसू लागले. मात्र ही गोष्ट यशवंतराव चव्हाण यांना कळल्यावर ते घाबरले. वेणूताईंसह ते सरोजिनीबाईंच्या खोलीवर आले आणि त्यांनी त्यांना चांगलंच सुनावलं. सरोजिनीबाईंनी त्यांना सांगितलं,
“आता पुन्हा मी असे कधीच करणार नाही.”
तेव्हा कुठे यशवंतराव शांत झाले.
आमदार किंवा खासदार असताना, अधिवेशनाला उपस्थित राहताना किंवा इतर राजकीय कामं करताना सरोजिनीबाईंचं लक्ष मात्र साहित्याकडेच असे. त्यांचा पिंड खराखुरा साहित्यिकाचा होता.
एकदा त्या काही कामानिमित्त अमरावतीला गेल्या होत्या. तिथं त्या अंबिकेच्या देवळात गेल्या. श्रीकृष्णानी रुक्मिणीचं हरण नेमकं कुठून केलं असेल, हे त्यांना पाहायचं होतं. त्यासाठी त्यांची नजर आजूबाजूला फिरत होती. त्या मनानं जणू द्वापारयुगात पोहोचल्या होत्या. पण त्यांच्याबरोबर आलेले लोक त्यांना वारंवार सांगत होते,
“लवकर चला, लवकर चला. व्याख्यानाची वेळ झाली आहे.”
अशा रीतीनं त्यांना पुन्हा व्यावहारिक जगात आणलं जात होतं. शेवटी रुक्मिणीहरण नेमकं कुठून झालं, हे न पाहताच त्या इतरांबरोबर व्याख्यानाला गेल्या.
सरोजिनीबाई प्रथम आमदार आणि नंतर खासदार झाल्या, तेही इतरांच्या आग्रहामुळे. त्यांना राजकारणात अजिबात रस नव्हता. त्या म्हणत, “साहित्य प्रथम, मग राजकारण.” वाचावं, लिहावं आणि खेडोपाडी जाऊन साध्या, भोळ्या भाबड्या स्त्रियांमध्ये रमावं, हे त्यांना मनापासून आवडत असे. पण प्रत्येक वेळी कोणीतरी त्यांना निवडणुकीला उभं राहण्याचा आग्रह करत असे. तेव्हा अण्णा म्हणत,
“लोक आपणहून म्हणत आहेत, विचारत आहेत, तर तुला नाही म्हणायला काय झालं? इतर लोक तिकीट मिळावं म्हणून जीवाचा आटापिटा करतात. तुला ही संधी चालून आली आहे, म्हणजे तुझ्यात काहीतरी विशेष आहे म्हणूनच ना?”
सरोजिनीबाईंना मात्र आपण काही विशेष करून दाखवलं आहे, असं कधीच वाटत नसे. एकदा त्या म्हणाल्या,
“आपल्याला विशेष काही करून दाखवायचं असेल, तर माणसानं आपलं चारित्र्य लख्ख ठेवावं आणि विरोधकांशी बोलताना आपल्या मर्यादा ओळखून बोलावं, असं आम्हाला साने गुरुजींनी शिकवलं होतं. त्याची प्रचिती मला माझ्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनात अनेकदा आली आहे.”
त्यांच्या अशा साध्या आणि सौजन्यपूर्ण वागण्यामुळे विरोधी पक्षातले लोकही त्यांना आदरानं वागवत आणि त्यांचं कौतुक करत. सर्वजण त्यांच्याशी आपुलकीनं वागत. त्या दुसऱ्या पक्षातील लोकांनाही घरी जेवायला बोलावत असत. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकांमध्ये चर्चेला उधाण येत असे. सरोजिनीबाईंच्या पक्षनिष्ठेबद्दलही काही जण शंका व्यक्त करत. मात्र, त्या अशा चर्चांना अजिबात महत्त्व देत नसत. दत्तोपंत ठेंगडी, एस. एम. जोशी, मोहनराव गवंडी अशी अनेक मंडळी विरोधी पक्षात असूनही सरोजिनीबाईंना त्यांच्याबद्दल आपुलकी होती. पक्षभेदापलीकडे जाऊन माणसांशी नातं जोडणं, हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं.