डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
१९५७ मध्ये सरोजिनीबाईंचा पाच वर्षांचा विधानसभा सदस्यत्वाचा कालावधी संपला. त्यानंतर दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले. मात्र सरोजिनीबाईंना पुन्हा निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं. त्यांना लेखन-वाचन करायचं होतं, लोकसाहित्याच्या संशोधनाचं काम पुढे न्यायचं होतं. शिवाय वडिलांनी सुरू केलेल्या ‘समाज शिक्षण माले’च्या कामातही सहभागी व्हायचं होतं. या सर्व कामांसाठी त्यांना वेळ मिळत नव्हता. सक्रिय राजकारणापासून दूर झाल्याशिवाय ही कामं पूर्ण करणं शक्य नव्हतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पिंड राजकारणाचा नव्हता. त्यांचं मराठी साहित्यावर अत्यंत प्रेम होतं आणि आपलं आयुष्य याच क्षेत्रात व्यतीत करावं, अशी त्यांची मनापासून इच्छा होती.
तरीही निवडणुकीच्या प्रचारसभांना त्यांना जावंच लागलं. आपल्या भाषणांत त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा मुद्दा ठामपणे मांडला. मराठी भाषेची समृद्धी आणि संतवाङ्मय यांवरही त्या विशेष भर देत असत.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात यांचं द्विभाषिक राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य निर्माण व्हावं आणि त्यात मुंबईचाही समावेश असावा, या मागणीसाठी ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रा’ची चळवळ सुरू झाली. सरोजिनीबाईंनीही या चळवळीत सहभागी होण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मुंबई प्रांताच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
भाऊसाहेब हिरे यांच्या बंगल्यावर सर्वजण जमले. सभागृहात मतदानाची वेळ आली तर द्विभाषिक राज्याच्या विरोधात मतदान करायचं, असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे मतदान झालं. त्यानंतर सरोजिनीबाई पुण्याला घरी परतल्या.
दुसऱ्याच दिवशी त्यांना सभापतींचा फोन आला. ते म्हणाले,
“ताबडतोब मुंबईला या. संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात सभागृहात मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावावर तुम्हाला बोलायचं आहे.”
सरोजिनीबाईंना प्रश्न पडला. आपण राजीनामा दिला आहे, मग सभागृहात कसं जाणार?
तेवढ्यात भाऊसाहेब हिरे यांचाही फोन आला. ते म्हणाले,
“सरोजिनी, तुझा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे तू अजूनही विधानसभेची सदस्य आहेस. म्हणूनच तुला प्रस्तावावर बोलण्यासाठी सभापतींनी फोन केला आहे. काहीही कारण न सांगता तू ताबडतोब मुंबईला निघून ये.”
याप्रसंगी वसंतदादा पाटील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होते. दुसऱ्या दिवशी सरोजिनीबाईंनी सभागृहात मराठी भाषेचं श्रेष्ठत्व सिद्ध करणारे प्राचीन मराठी वाङ्मयातील अनेक उतारे सादर केले. संत ज्ञानेश्वरांच्या ‘माझा? मराठाचि बोलु कवतुके’ या ओवीचाही आधार घेत त्यांनी सविस्तर भाषण केलं. मराठी भाषा आणि साहित्याचा त्यांचा अभ्यास इतका दांडगा होता की त्या मराठी भाषेचं श्रेष्ठत्व प्रभावीपणे मांडू शकल्या. त्यांनी या भाषणासाठी खूप कष्ट घेतले होते. अनेक संदर्भ गोळा करून मराठी भाषेची महती सभागृहातील सदस्यांना पटवून दिली. सर्वांनी त्यांच्या भाषणाचं खूप कौतुक केलं. अखेर १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
एकदा कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सभागृहापुढे आला. त्या वेळी सरोजिनीबाईंनी वकील व्ही. एन. पाटील यांची मदत घेऊन या विषयावर सविस्तर भाषण केलं. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, आपण वकिलीचा अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल. त्यासाठी त्या कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्य टोपे यांना भेटल्या. मात्र आठवड्यातून किमान दोनदा कॉलेजमध्ये उपस्थित राहणं आवश्यक असल्याची अट होती. सरोजिनीबाईंना नियमित हजेरी लावणं शक्य नव्हतं. त्यामुळे वकिलीचा अभ्यास करण्याचा त्यांचा बेत बारगळला. मात्र शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य हे विषय चर्चेला आले की, त्या आवर्जून भाग घेत असत.
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले आणि बाळासाहेब देसाई पहिले शिक्षणमंत्री झाले. सरोजिनीबाईंनी दोघांचंही अभिनंदन केलं. तेव्हा बाळासाहेब देसाई त्यांना म्हणाले,
“ताई, काहीही काम असेल तर सांगा. आम्ही ते करू.”
त्यावर सरोजिनीबाई म्हणाल्या,
“मराठा शिक्षण परिषदेला पर्वती रमण्यात जागा द्या आणि मराठीतील साहित्यिकांच्या उत्तमोत्तम पुस्तकांना पारितोषिकं द्या.”
खरं तर आता सरोजिनीबाई आमदार नव्हत्या. तरीही लोकांच्या कामांचा तगादा काही कमी होत नव्हता. लोक वेगवेगळी कामं घेऊन त्यांच्याकडे येत आणि ती करून देण्याचा आग्रह धरत.
ते म्हणत,
“तुम्ही आमदार नसलात तरी तुमची सर्वांशी ओळख आहे. त्यामुळे आमची कामं तुम्ही सहज करून देऊ शकाल.”
सरोजिनीबाईंवर लोकांचा इतका विश्वास होता की, आमदार नसतानाही ते आपली कामं घेऊन त्यांच्याकडे येत असत.
१९६३ मध्ये दादासाहेब कन्नमवार यांनी सरोजिनीबाईंना राज्यपाल-नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर घ्यायचं ठरवलं. त्या लेखिका होत्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सरोजिनीबाईंना मात्र राजकारणात भाग घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनीच ठरवलं होतं, त्यामुळे नाही म्हणू नये, असं अण्णांचं मत होतं. शेवटी सरोजिनीबाई विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारण्यास तयार झाल्या.
गंगुबाईंना ही गोष्ट अजिबात पसंत नव्हती. आमदार झाल्यावर अक्कांना एकट्यानं मुंबईला जावं लागलं असतं आणि हॉटेलमध्ये राहावं लागलं असतं. त्यामुळे त्यांनी या गोष्टीला विरोध केला. पण अण्णांना वाटत होतं की, चालून आलेली संधी स्वीकारली पाहिजे आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या आव्हानांना आनंदानं सामोरं गेलं पाहिजे.
सरोजिनीबाई विधान परिषदेत कोणत्याही विषयावर ठामपणे बोलत असत. त्यांनी अनेक हरिजन आणि मागासवर्गीय मुलांसाठी असलेली वसतिगृहं पाहिली होती. शेतकऱ्यांच्या आणि गरीब कुटुंबांतील मुलांसाठीही अशी वसतिगृहं असली पाहिजेत, असं त्यांना वाटत होतं. एका भाषणात त्यांनी ही मागणी मांडली. तेव्हा आंबेडकर परिवारातील एका आमदारानं त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दोघांमध्ये बरंच अंतर असूनही त्या आमदारानं पुढे वाकून सरोजिनीबाईंच्या ब्लाउजची कॉलर खेचण्याचा प्रयत्न केला. सरोजिनीबाईंना त्यांचा खूप राग आला. त्यांचं वर्तन अतिरेकीपणाचं होतं.
सभापती वारंवार ‘ऑर्डर, ऑर्डर’ असं सांगत होते. शेवटी एन. डी. पाटील यांनी त्या आमदाराला सभागृहाबाहेर नेलं आणि त्याला जाब विचारला. एवढा प्रकार घडूनही सरोजिनीबाई आपल्या मागणीवर ठाम राहिल्या. शेतकऱ्यांच्या मुलांवर अन्याय होत आहे आणि त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, असं त्या सांगत राहिल्या. सभागृहातलं वातावरण इतकं तापलं की, शेवटी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला.
या प्रसंगामुळे सरोजिनीबाईंना इतका राग आला की, त्या आमदार निवासातील आपलं सामानही न घेता पुण्याला घरी परतल्या. घरी गेल्यावर त्यांनी अण्णांना घडलेला प्रकार आणि आपली नाराजी सविस्तर सांगितली. तेव्हा अण्णा म्हणाले,
“असं रागावून चालत नाही. आपलं म्हणणं ठासून सांगायचं. कधी ना कधीतरी न्याय मिळतोच. न्याय मिळेपर्यंत वाट पाहायची.”
सरोजिनीबाई देशाच्या प्रगतीसाठी कोण कुठे काय काम करत आहे, याकडे नेहमी लक्ष देत असत. त्याची नोंदही ठेवत. सभागृहात भाषण करताना या माहितीचा त्यांना उपयोग होत असे. पाय अधू असूनही त्यांनी एक-दोन वेळा कोयना धरणाच्या बांधकामाची पाहणी केली. भाक्रा-नांगल धरणाच्या उंच पहाडावरही त्या मोठ्या कष्टानं चढून गेल्या.
आमदार असताना अक्कांनी शेतापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, अशी मागणी केली होती. काही वर्षांनी त्यांची ही मागणी पूर्ण झाली.
आमदारकी स्वीकारल्यामुळे अक्कांना कुठेही, कधीही बोलावणं येत असे. कधी मुख्यमंत्र्यांकडून निरोप येई की, ताबडतोब अमुक ठिकाणी जा आणि हे काम करा. कधी परदेशी पाहुणे येत आणि त्यांना काही ठिकाणं दाखवायची असत. सरोजिनीबाई शिकलेल्या होत्या आणि इंग्रजी बोलू शकत होत्या. त्यामुळे अशा वेळी त्यांना जावं लागे.
यामुळे गंगुबाईंना खूप राग येत असे. त्या म्हणत,
“पुरे झाली तुझी आमदारकी. सोडून दे तुझी समाजसेवा. यातून काय मिळतं? एक दिवस सुट्टी नाही की आराम नाही. कोणीही कधीही बोलावलं की जायचं. हे काय आयुष्य आहे? मला मुळीच पसंत नाही तुझं हे राजकारण.”
पण अण्णा म्हणत,
“सरोजिनी, तू काम स्वीकारलं आहेस तर तक्रार करून चालणार नाही. लोकांना आमदारकी मिळवण्यासाठी मोठ्या माणसांच्या पाया पडावं लागतं, अर्ज लिहावे लागतात. तुला ही आमदारकी आयती चालून आली आहे, हे लक्षात ठेव.”
कधी कधी अक्कांचे पाय आणि अंग दुखत असे. तापही आलेला असे. पण अशा वेळीही त्यांना कामासाठी बाहेर पडावं लागे. राजकीय आणि सामाजिक जीवनात नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या माणसाला स्वतःचं आयुष्य उरत नाही. स्वतःची सुख-दुःखं बाजूला ठेवून लोकांसाठी काम करावं लागतं, हे सरोजिनीबाईंनी मनोमन स्वीकारलं होतं.
सरोजिनीबाई प्रत्येक प्रसंगाला निर्भयपणे आणि धिटाईनं सामोऱ्या जात असत. असाच एक प्रसंग घडला. एकदा त्या काही महिलांबरोबर गाडीतून प्रवास करत होत्या. ड्रायव्हरचा रस्ता चुकला. रात्रीच्या वेळी एक दांडगा बेरड हातात कुऱ्हाड घेऊन गाडीसमोर उभा ठाकला. ड्रायव्हरनं घाबरून गाडी थांबवली. त्या माणसानं तोंडावर घोंगडी गुंडाळली होती.
सरोजिनीबाई जोरात म्हणाल्या, “कोण रे तू?”
तो बेरड म्हणाला, “तू कोण गं मला विचारणारी?”
सरोजिनीबाई शांतपणे म्हणाल्या, “मी बाबर मास्तरांची लेक.”
हे ऐकल्यावर तो बेरड पुढे येऊ लागला. अक्का म्हणाल्या,
“पहिली कुऱ्हाड खाली टाक. मगच पुढे ये.”
त्या माणसानं तोंडावरची घोंगडी काढली. पुढे येऊन त्यानं विचारलं,
“कोण? अक्काताई का तू? ओळखलं नाहीस का मला? मी अण्णांच्या शाळेतला. तू लहान असताना मी तुला खेळवलं आहे.”
त्यानंतर त्यानं शिट्टी वाजवून आपल्या सहकाऱ्यांना बोलावलं आणि ड्रायव्हरला पुढचा रस्ता दाखवला. अण्णांच्या ओळखीचा सरोजिनीबाईंना अनेकदा फायदा होत असे. निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या गावोगावी जात, तेव्हा अण्णांच्या विद्यार्थ्यांपैकी कोणी ना कोणी त्यांना भेटत असे. अशा रीतीनं वडिलांची पुण्याई त्यांच्या कामी येत असे. अण्णांनी आपल्या स्वभावानं स्नेही आणि विद्यार्थ्यांचा मोठा गोतावळा जमवला होता. त्यांचे स्नेही आणि विद्यार्थी सर्वत्र विखुरलेले होते. याचा प्रत्यय सरोजिनीबाईंना वारंवार येत असे.
एकदा नागपूरला विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना विनोबा भावे यांचा निरोप घेऊन ग. दि. माडगुळकर आले. त्यांनी सरोजिनीबाईंना सांगितलं,
“तुम्हाला विनोबाजींनी बोलावलं आहे.”
सरोजिनीबाई पवनार आश्रमात गेल्या. त्या वेळी विनोबांचं मौन सुरू होतं. सरोजिनीबाई भेटायला आल्यावर त्यांनी एका पाटीवर लिहिलं,
“राजकारण करायला पुष्कळ लोक आहेत. तुम्ही राजकारण सोडून द्या आणि लेखक म्हणूनच जगा.”
सरोजिनीबाई म्हणाल्या,
“असं कसं? माझं लेखन चालूच आहे.”
त्यांचं उत्तर ऐकून विनोबाजींना राग आला. त्यांनी पाटीवर लिहिलं,
“मोठ्या माणसांनी सांगितलेलं गुपचूप ऐकावं. मी सांगतोय ते बरोबर आहे.”
थोड्या वेळानं त्यांनी सरोजिनीबाईंना ओव्या म्हणायला सांगितल्या. सरोजिनीबाईंनी रामाच्या संदर्भातील काही ओव्या म्हटल्या. त्या ऐकून विनोबाजी प्रसन्नपणे हसले. त्यांनी पुन्हा पाटीवर लिहिलं,
“हे काम सोडून राजकारणात कशाला आलात? तुमचा आवाज गोड आहे. मी रोज रेडिओवर तुमचा आवाज ऐकतो. राजकारण करणं हे तुमचं काम नाही.”
इतकंच नव्हे, तर विनोबाजींनी सरोजिनीबाईंच्या ओव्यांचं रेकॉर्डिंगही करून घेतलं.
नागपूरला अधिवेशन सुरू असताना एकदा सरोजिनीबाई रामकृष्ण मठाच्या ग्रंथालयातली पुस्तकं पाहायला गेल्या. तिथल्या लोकांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं. त्या रामकृष्ण मिशनच्या ‘जीवन विकास’ या पत्रिकेत अधूनमधून लेख लिहीत असत. त्यामुळे तिथं त्यांच्या नव्या लिखाणाविषयी चर्चा सुरू झाली. इतक्यात त्यांच्याबरोबर असलेल्या आमदार मालतीबाई शिरोळे तिथं आल्या आणि सरोजिनीबाईंना खोलीबाहेर घेऊन गेल्या. सरोजिनीबाई संन्यास घेऊन रामकृष्ण मठात सामील होणार की काय, अशी त्यांना भीती वाटली होती. मालतीबाई म्हणाल्या,
“अगं सरोजिनी, काय बोलत होतीस त्या लोकांशी एवढा वेळ? राजकारण सोडून संन्यास घ्यायचा विचार करतेस की काय?”
नंतर त्या सरोजिनीबाईंना त्यांच्या खोलीवर घेऊन आल्या. या प्रसंगानंतर सरोजिनीबाईंच्या मनात विचार आला,
‘आमदारकी स्वीकारली म्हणून एवढी बंधनं कशाला? मला हवं तिथं मी जाईन. माणूस आमदार किंवा खासदार असला म्हणून काय झालं? आपण सगळा वेळ लोकांसाठी, जनसामान्यांसाठीच बांधील असायचं का? आपलं स्वतःचं असं काही आयुष्य असायला नको का?’