डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
सरोजिनीबाईंचे वडील अण्णा म्हणजेच कृष्णराव यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली. त्यावेळी महाराष्ट्रभर पसरलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी पैसे जमा केले. हा निधी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णरावांना अर्पण करण्यात आला. या निधीत अण्णांनी स्वतःची भर घालून एक प्रकाशन उपक्रम सुरू केला. २० ऑक्टोबर १९५० रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘समाज शिक्षण माले’ची स्थापना झाली. त्याच दिवशी अण्णांनी लिहिलेल्या ‘दसरा दिवाळी’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं.
सर्वसामान्य लोकांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांना विविध विषयांचं प्राथमिक ज्ञान मिळावं, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. त्यासाठी त्या त्या विषयातील निष्णात व्यक्तींकडून सोप्या भाषेत लिहून घेतलेलं एक छोटं पुस्तक दर महिन्याच्या वीस तारखेला प्रकाशित करण्याचं ठरलं. या पुस्तकांचं संपादन सरोजिनीबाई करत असत, तर लेखनाबरोबरच इतर व्यवस्थापनाची जबाबदारी अण्णा सांभाळत असत.
अण्णा शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे त्यांना शिक्षणाबद्दल विशेष आस्था होती. मुलींच्या शिक्षणाला ते प्राधान्य देत. एवढंच नव्हे, तर त्यांच्या मते प्रौढ शिक्षणही अत्यंत महत्त्वाचं होतं.
इतिहास, भूगोल, आरोग्य, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, अध्यात्म, क्रीडा, कला, शेती, काव्य, स्त्रीशिक्षण, बालसंस्कार, सामाजिक सुधारणा आणि लोकजीवन अशा विविध विषयांवर या मालिकेत पुस्तकं प्रसिद्ध झाली. नवसाक्षरांना या पुस्तकांमधून उपयुक्त माहिती मिळावी, हा त्यामागचा उद्देश होता. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील प्रौढशिक्षण आणि समाजशिक्षण चळवळीला मोठी चालना मिळाली.
दीनानाथ दलाल, ग. ना. जाधव यांच्यासारख्या मातब्बर चित्रकारांकडून पुस्तकांची मुखपृष्ठं तयार करून घेतली जात. आनंद मुद्रणालयात ही पुस्तकं छापली जात. पु. ल. देशपांडे यांनी कृष्णरावांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं होतं,
“सोपं लिहिणं हे सर्वांत अवघड काम आहे. तुमच्या डोळ्यांपुढे तुमचा वाचक त्याच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमीसकट उभा आहे. त्याचं हित कशात आहे, हे तुम्हाला पक्कं ठाऊक आहे. म्हणूनच ही समाज शिक्षण माला वर्षानुवर्षं वाचकांशी संवाद साधू शकली.”
सर्वसामान्य वाचकांबरोबरच विद्वानांमध्येही ही वाचनमाला लोकप्रिय झाली.
समाज शिक्षण मालेनं एकूण ५५० पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांपैकी अण्णांची ९९, सरोजिनीबाईंची ८७, त्यांच्या दोन धाकट्या बहिणींची—कुमुदिनी पवार यांची १८ आणि शरदिनी मोहिते यांची ५१—अशी बाबर घराण्यातील सदस्यांची एकूण २५५ पुस्तकं होती. उर्वरित २९५ पुस्तकं इतर लेखकांची होती. त्यांत ग. ल. ठोकळ, सुमती क्षेत्रमाडे, नरूभाऊ लिमये, कुमुदिनी रांगणेकर, मालती दांडेकर, मृणालिनी देसाई, दुर्गा भागवत, शंकरराव खरात, बापू वाटवे, ना. सी. फडके, शंकर पाटील, रमेश मंत्री, महामहोपाध्याय पोतदार, गोपीनाथ तळवळकर, जयंत नारळीकर, राम शेवाळकर आणि डॉ. रा. ना. दांडेकर यांसारख्या लेखकांचा समावेश होता. अण्णा हयात असेपर्यंत या मालिकेची २८५ पुस्तकं प्रकाशित झाली. उर्वरित पुस्तकं त्यांच्या पश्चात सरोजिनीबाईंनी प्रकाशित केली.
पुढे समाज शिक्षण मालेचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. त्यामुळे या कार्याला संस्थात्मक स्वरूप आलं आणि सरकारकडून अनुदान मिळू लागलं. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाकडूनही काही अनुदान मिळू लागलं. पुढे सरोजिनीबाईंची या मंडळाच्या सदस्य म्हणून निवड झाली. अण्णा कचेरीत बसून हिशेब सांभाळत, तर सरोजिनीबाई प्रचार, शासनाशी पत्रव्यवहार आणि प्रकाशन समारंभांची जबाबदारी पार पाडत. महाराष्ट्र शासनाच्या साक्षरता प्रसाराच्या कामात या मालेचा मोठा उपयोग झाला.
समाज शिक्षण मालेचा २७५ वा अंक भगवद्गीतेवर होता. त्यावेळी सरोजिनीबाई राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांची नंदिनी सत्पथी यांच्याशी ओळख झाली होती. नंदिनी सत्पथी या भारत सरकारमध्ये राज्यमंत्री होत्या. त्यांना लेखनाची आवड असल्यामुळे सरोजिनीबाई आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. याच सुमारास अण्णांचा पंचाहत्तरावा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं सरोजिनीबाईंनी नंदिनी सत्पथी यांना पुण्याला बोलावलं. त्या ओडिशातील होत्या. प्रकाशन समारंभात त्या अतिशय छान बोलल्या. त्यानंतर समाज शिक्षण मालेची प्रसिद्धी दिल्लीपर्यंत पोहोचली.
समाज शिक्षण मालेच्या ४०० व्या अंकाचं प्रकाशनही मोठ्या थाटात पार पडलं. त्यावेळी यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. वसंतदादा मुख्यमंत्री होते. या कामासाठी बाबर मंडळींना सरकारकडून मोठा निधी मिळत असावा, असं लोकांना वाटे. प्रत्यक्षात मात्र तसं नव्हतं. सरोजिनीबाई आणि त्यांचे वडील कृष्णराव यांच्या कार्यावरील प्रेम आणि आदरामुळे अनेक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या घरी किंवा अशा कार्यक्रमांना आवर्जून येत असत. काका गाडगीळ, जयवंतराव टिळक, ग. दि. माडगूळकर, शंतनुराव किर्लोस्कर, मोरारजीभाई देसाई, शिवाजीराव भोसले आणि डॉ. ग. श्री. खैर अशी अनेक मान्यवर मंडळी सरोजिनीबाई आणि त्यांच्या वडिलांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी येत असत.
अण्णांनी अखेरच्या काळात सरोजिनीबाईंना सांगितलं होतं,
“वेळ आलीच तर घर विक, पण घेतलेलं हे काम सोडू नको.”
सरोजिनीबाईंचा एक पाय पोलिओमुळे अधू होता. त्या नोकरीही करत नव्हत्या. अण्णांनी छापखाना आणि लेखनाचा वारसा आपल्या लेकीसाठी ठेवला होता.
समाज शिक्षण मालेचं काम खासगी स्वरूपाचं असल्यामुळे त्याची बहुतांश जबाबदारी सरोजिनीबाईंना एकट्यानं सांभाळावी लागे. याउलट, लोकसाहित्य समितीचं काम सरकारी स्वरूपाचं असल्यामुळे तिथं अनेक मंडळी मदतीला असत. समाज शिक्षण मालेसाठी आर्थिक अडचणी नेहमीच असत, तर लोकसाहित्य समितीला सरकारी मदत मिळत असे. अर्थात, दोन्ही ठिकाणी कामाचं स्वरूप काहीसं सारखं होतं. पत्रव्यवहार सांभाळणं, प्रास्ताविक लिहिणं, मुद्रितं तपासणं, कागदाची प्रतवारी ठरवणं, चित्रकारांकडून चित्रं काढून घेणं, पुस्तकांची किंमत ठरवणं अशी अनेक कामं करावी लागत.
दोन्ही ठिकाणी सरोजिनीबाई तेवढ्याच उत्साहानं आणि आत्मीयतेनं काम करत असत. लोकसाहित्याचं संकलन करणं हे त्यांचं विशेष आवडीचं काम होतं. त्यांच्यामुळे आपली लोकगीते, उखाणे, म्हणी, कोडी, ओव्या अशा अनेक गोष्टी जतन झाल्या. शहरीकरणामुळे सण-उत्सव आणि लोकपरंपरा मागे पडत चालल्या आहेत किंवा त्यांत बदल होत आहेत. शहरांमध्ये जात्यावर दळणं, रांगोळ्या काढणं, झिम्मा, फुगड्या, हादगा, मंगळागौर अशा अनेक गोष्टी पूर्वीसारख्या शक्य राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या परंपरांशी संबंधित लोकसंगीत जतन करणं अत्यंत आवश्यक होतं. सरोजिनीबाईंनी हे महत्त्वाचं काम केलं.