डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
सरोजिनीबाईंचं आयुष्य अनेक माणसांच्या सहवासानं समृद्ध झालं. कुटुंबीयांकडून मिळालेले संस्कार, साहित्यिक आणि कलावंतांचं मार्गदर्शन, मित्रांची साथ आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांशी आलेला जवळचा संबंध, या सगळ्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला. त्यांनीही आपल्या सहवासात आलेल्या माणसांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. त्यांच्या कार्यात आणि विचारविश्वात या मित्रपरिवाराचं योगदान महत्त्वाचं होतं.
सरोजिनीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आणि त्यांच्या राजकीय व साहित्यिक क्षेत्रातील यशात त्यांचे वडील कृष्णराव बाबर यांचा फार मोठा वाटा होता. सरोजिनीबाईंनी राजकारणात यावं, यासाठी त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं. सार्वजनिक जीवनातही वेळोवेळी मार्गदर्शन केलं. कृष्णराव स्वतः शिक्षक होते, तसेच लेखकही होते. त्यांच्या सहवासातून सरोजिनीबाईंना साहित्याची गोडी लागली. साहित्य क्षेत्रातील कृष्णरावांच्या अनेक ओळखी होत्या. त्यांचे विद्यार्थीही महाराष्ट्रभर पसरले होते. या ओळखींचा सरोजिनीबाईंना पुढे मोठा फायदा झाला. कृष्णरावांनी सुरू केलेल्या ‘समाज शिक्षण माले’च्या माध्यमातून सरोजिनीबाईंना साहित्यनिर्मितीसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ मिळालं.
सरोजिनीबाईंच्या जडणघडणीत आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्राध्यापक गुरुवर्य बापूसाहेब माटे. बापूसाहेब माटे हे सरोजिनीबाईंसाठी केवळ शिक्षक नव्हते, तर त्यांच्या मनात साहित्य आणि देशप्रेमाची बीजं रोवणारे प्रेरणास्थान होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांचं मार्गदर्शन सरोजिनीबाईंना मिळत राहिलं. माटे यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी संपादनाच्या कामाचा सुरुवातीचा अनुभव घेतला. याच अनुभवाचा पुढे लोकसाहित्याचे अनेक ग्रंथ संपादित आणि प्रकाशित करताना त्यांना उपयोग झाला.
प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर, म्हणजेच भाऊसाहेब, यांच्याशी सरोजिनीबाईंचं अत्यंत जिव्हाळ्याचं मैत्रीचं नातं होतं. भाऊसाहेब वयाने त्यांच्यापेक्षा खूप मोठे होते. पण वयाचं अंतर त्यांच्या मैत्रीच्या आड कधी आलं नाही. सरोजिनीबाई कोल्हापूरला गेल्या की भाऊसाहेबांना आवर्जून भेटत. साहित्य, राजकारण आणि सामाजिक चळवळी अशा विविध विषयांवर त्यांच्यात चर्चा होत असे. या संवादातून भाऊसाहेबांचं मार्गदर्शनही त्यांना मिळत राहिलं. या व्यतिरिक्त सरोजिनीबाईंच्या जडणघडणीत साने गुरुजींचाही फार मोठा वाटा होता. देशप्रेम आणि साहित्य या दोन्हीच्या प्रेरणा त्यांना साने गुरुजींकडून मिळाल्या.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य सोनूमामा दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखालीही सरोजिनीबाई घडल्या. त्यांच्याविषयी सरोजिनीबाईंच्या मनात खूप आदर होता. ग. ल. ठोकळ यांच्याशीही त्यांचं विशेष जिव्हाळ्याचं नातं होतं. साहित्याविषयीच्या चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण आणि सामाजिक विषयांवरील संवाद यामुळे या मैत्रीला एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालं होतं.
कवयित्री आणि लेखिका शांताबाई शेळके यांच्याशी सरोजिनीबाईंची मैत्रीही अत्यंत घट्ट होती. महाविद्यालयीन दिवसांपासून सुरू झालेलं हे मैत्रीचं नातं पुढे त्यांच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यातही कायम राहिलं. महाविद्यालयीन उपक्रम, दूरदर्शनवर गाजलेली ‘रानजाई’ मालिका, ‘कुलदैवत’ ग्रंथाची निर्मिती आणि इतर अनेक साहित्यिक कामांमध्ये दोघींनी एकत्र काम केलं.
याशिवाय सरोजिनीबाईंच्या परिचयाच्या आणि स्नेहाच्या वर्तुळात अनेक साहित्यिक, विचारवंत, संशोधक, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक होते. प्र. के. अत्रे, कवी गिरीश, बा. ग. जगताप, रियासतकार गो. स. सरदेसाई, सेतुमाधवराव पगडी, डॉ. वा. भा. पाठक, बाबासाहेब पुरंदरे, द. वा. पोतदार, द. रा. बेंद्रे, गो. चि. माटे, आबासाहेब मुजुमदार, कवी यशवंत, डॉ. के. ना. वाटवे आणि डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्याशी त्यांचा परिचय होता. वि. स. खांडेकर, मालतीबाई दांडेकर, मृणालिनी देसाई, नानासाहेब गाडगीळ, गो. नी. दांडेकर, राम शेवाळकर आणि जयंत नारळीकर यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते.
साहित्यिकांप्रमाणेच अनेक कलाकारांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. हिराबाई बडोदेकर आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या घरीही सरोजिनीबाई अगदी सहजपणे जाऊ शकत असत. अशा साहित्यिक, कलावंत आणि विद्वानांच्या सहवासातून त्यांचं विचारविश्व अधिकाधिक समृद्ध होत गेलं.
सार्वजनिक जीवनात सक्रिय असल्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांशीही सरोजिनीबाईंचे जवळचे संबंध होते. यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील, काकासाहेब गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, ना. ग. गोरे, मोहन धारिया आणि शरद पवार यांच्याशी त्यांचा स्नेह होता. महाराष्ट्राबाहेरील राष्ट्रीय पातळीवरील नेते आणि विद्वानांशीही त्यांचा संपर्क होता. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याची विविध स्तरांवर दखल घेतली जात असे.
सरोजिनीबाईंच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत यशवंतराव चव्हाण यांचा फार मोठा वाटा होता. यशवंतराव त्यांना आपल्या बहिणीप्रमाणे मानत. त्यांच्या राजकीय विचारसरणीचा सरोजिनीबाईंवर मोठा प्रभाव होता. सरोजिनीबाईंना राजकारणात आणण्यातही यशवंतरावांची महत्त्वाची भूमिका होती. पुढे १९६८ मध्ये त्यांच्या आग्रहामुळेच सरोजिनीबाईंनी राज्यसभेची निवडणूक लढवली. महाराष्ट्रात लोकसाहित्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांनाही यशवंतरावांनी मोलाची मदत केली.
वसंतदादा पाटील आणि सरोजिनीबाई यांच्यातही आपुलकीचे आणि सहकार्याचे संबंध होते. वसंतदादांनी त्यांच्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. १९५२ मध्ये सरोजिनीबाई पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला उभ्या राहिल्या, तेव्हा वसंतदादांनी त्यांच्यासाठी प्रचार केला. १९६८ मध्ये सरोजिनीबाई राजकारणापासून दूर राहू इच्छित असताना वसंतदादांनीच त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास प्रवृत्त केलं. लोकसाहित्याच्या कामात आणि ग्रंथांच्या प्रकाशनातही त्यांनी सरोजिनीबाईंना नेहमीच मदत केली.
पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरोजिनीबाई यांच्यातही चांगली मैत्री होती. ‘कुलदैवत’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ इंदिराजींच्या निवासस्थानी झाला होता. त्यांचे संबंध केवळ राजकीय नव्हते, तर वैयक्तिकही होते. दोघींच्या अनेक आवडीनिवडी सारख्या होत्या. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला होता.
सरोजिनीबाईंचा स्वभाव माणसं जोडणारा होता. त्या केवळ प्रसिद्ध व्यक्तींशीच संबंध ठेवत नसत, तर सामान्य माणसांच्या अनुभवांनाही तितकंच महत्त्व देत. लोकजीवनाचा अभ्यास करताना ग्रामीण भागातील स्त्रिया, लोककलावंत, गायक, कथाकथन करणारे आणि विविध लोकपरंपरा जपणारे लोक यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले. त्यामुळे त्यांचं स्नेहाचं आणि परिचयाचं वर्तुळ समाजाच्या अनेक स्तरांपर्यंत पोहोचलं होतं.
सरोजिनीबाईंना आयुष्यात अनेक जीवाभावाचे स्नेही लाभले. या दृष्टीने त्या स्वतःला अत्यंत श्रीमंत मानत असत. त्यांचा मित्रपरिवार म्हणजे केवळ प्रसिद्ध व्यक्तींची यादी नव्हती, तर मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या एका समृद्ध कालखंडाचं प्रतिबिंब होतं. या सहवासातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत राहिली. साहित्यिक मैत्री, वैचारिक देवाणघेवाण, लोकसाहित्याची जपणूक आणि समाजशिक्षणाची बांधिलकी यांचा सुंदर संगम त्यांच्या जीवनात दिसून येतो.
सरोजिनीबाई आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्यांचा धाकटा भाऊ जवाहर याचं निधन झाल्यानंतर त्यांनी आईला एक शब्द दिला होता. आईला दिलेला हा शब्द त्यांनी आयुष्यभर पाळला. सरोजिनीबाईंना कुमुदिनी आणि शरदिनी अशा दोन बहिणी होत्या. या दोघींनाही सरोजिनीबाईंचा अत्यंत अभिमान होता. लोकगीते आणि लोककथा संकलित करताना आई आणि बहिणींनी त्यांना खूप मदत केली.
सरोजिनीबाई आपलं आयुष्य अत्यंत समृद्धपणे जगल्या. त्यांचं निधन रविवार, २० एप्रिल २००८ रोजी पहाटे तीन वाजता पुण्यात झालं. त्या वेळी त्यांचं वय ८८ वर्षं होतं. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरोजिनीबाईंच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली. लोकसंस्कृतीचा ध्यास घेऊन आयुष्यभर तिचं जतन आणि संवर्धन करणारी, माणसांशी नाती जोडणारी आणि आपल्या कार्यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी एक असामान्य व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र एका विदुषीला, लोकसंस्कृतीच्या निष्ठावान अभ्यासकाला आणि प्रेमळ माणसाला मुकला. त्यांचं कार्य मात्र पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.