डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
महाराष्ट्राची लोकसंस्कृती ही श्रद्धा आणि परंपरा यांच्याशी घट्ट जोडलेली आहे. प्रत्येक घराण्याचं एक कुलदैवत असतं. या देवतेशी त्या घराण्याच्या अनेक पिढ्यांच्या श्रद्धा, आठवणी आणि परंपरा जोडलेल्या असतात. सुख-दुःखाच्या प्रसंगी कुलदैवताचं स्मरण करणं, त्याच्या दर्शनाला जाणं, नवस बोलणं आणि कुळाचार पाळणं हा महाराष्ट्रयल्या अनेक कुटुंबांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या श्रद्धा आणि परंपरांचं विश्व उलगडून दाखवणारा डॉ. सरोजिनी बाबर यांनी संपादित केलेला ‘कुलदैवत’ हा ग्रंथ मराठी लोकसाहित्याच्या क्षेत्रातलं त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या वतीनं प्रकाशित झालेल्या या ग्रंथाची पहिली आवृत्ती २६ जानेवारी १९७४ रोजी प्रसिद्ध झाली. वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे दीपावली १९९२ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. सरोजिनीबाईंच्या अध्यक्षतेखाली प्रा. वामनराव चोरघडे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. शांता शेळके, सौ. शैलजा राजे, डॉ. भाऊ मांडवकर आणि प्रा. बापूराव जगताप अशा अनेक मान्यवरांच्या सहभागातून हा ग्रंथ साकार झाला. जवळपास चारशे ते साडेचारशे संशोधक, अभ्यासक आणि लेखकांनी या ग्रंथासाठी योगदान दिलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करणं, तिचं संशोधन करणं आणि त्याचं संपादन करणं हे खरोखरच मोठं काम होतं.
‘कुलदैवत’ हा केवळ देवदेवतांची किंवा मंदिरांची माहिती देणारा ग्रंथ नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पसरलेल्या धार्मिक श्रद्धा, कुळाचार, लोकपरंपरा, मंदिरांचा इतिहास, वास्तुकला आणि त्यांच्याभोवती निर्माण झालेल्या लोककथा यांचा हा एक समृद्ध दस्तऐवज आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे अनेक पैलू या ग्रंथातून आपल्यासमोर उलगडत जातात.
ग्रंथाच्या सुरुवातीला सरोजिनीबाईंनी लिहिलेला ‘रानफूल’ हा ललित निबंध आहे. या निबंधातून त्यांनी कुलदैवताच्या संकल्पनेचा वेध घेतला आहे. माणसाच्या मनातली भीती, श्रद्धा, चिंता, आशा आणि असुरक्षिततेतून देवतेची कल्पना कशी निर्माण झाली असावी, याचं त्यांनी सहजसुंदर विवेचन केलं आहे. माणसानं आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी एखादी अलौकिक शक्ती असावी, अशी कल्पना केली. त्या अव्यक्त शक्तीला आकार दिला. लाकूड, दगड किंवा धातूच्या मूर्तींमधून आपल्या भावना आणि श्रद्धा व्यक्त केल्या. त्यातूनच कुलदेवता किंवा कुलदैवत ही संकल्पना रूढ झाली, असा विचार त्या मांडतात.
या निबंधात सरोजिनीबाईंनी ग्रामीण भक्तांच्या देवदर्शनाच्या प्रवासाचं अत्यंत जिवंत चित्र उभं केलं आहे. बैलगाड्यांतून निघालेले भक्त, डोंगरवाटांनी अनवाणी चालणारी माणसं, यात्रेचा उत्साह आणि देवाच्या दर्शनासाठी मनात असलेली ओढ या सगळ्यांतून लोकश्रद्धेचं दर्शन घडतं. नवरात्रातली घटस्थापना, बोडण, कडकणी, कणकेचे दिवे, हळदीकुंकवाचे ठसे, देवाचा कौल आणि प्रसाद अशा कुळाचारांमागच्या लोकभावनाही त्यांनी समजावून सांगितल्या आहेत. या परंपरा म्हणजे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर पिढ्यान्पिढ्या जपलेल्या सांस्कृतिक स्मृती आहेत, हे त्यांच्या लेखनातून जाणवतं.
या ग्रंथाचे दोन प्रमुख विभाग आहेत. पहिल्या विभागात विविध कुलदैवतांची स्थाने, त्यांचा इतिहास, धार्मिक महत्त्व, मंदिरांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्याशी संबंधित परंपरा यांची संशोधनपूर्ण माहिती दिली आहे. दुसऱ्या विभागात लोकमानसात रूढ झालेल्या कथा-कहाण्या आणि व्रतवैकल्यांशी संबंधित कथांचा समावेश केला आहे.
महाराष्ट्राच्या लोकजीवनात शिव आणि महादेव यांना कुलदैवत म्हणून विशेष स्थान आहे. त्यामुळे ग्रंथात महाराष्ट्रातल्या अनेक शिवस्थानांची सविस्तर माहिती दिली आहे. सातारा जिल्ह्यातल्या शिंगणापूरचे शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्या परिसरातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी एक भव्य तलाव बांधला. या तलावाची, म्हणजेच शिवतीर्थाची माहिती ऐतिहासिक कागदपत्रं आणि बखरींच्या आधारे ग्रंथात दिली आहे. मुंगी घाटातून निघणाऱ्या कावडी, चैत्र महिन्यात भरणारी यात्रा आणि त्यात सहभागी होणाऱ्या भक्तांचा उत्साह यांचंही वर्णन वाचायला मिळतं.
बारा ज्योतिर्लिंगं आणि इतर ऐतिहासिक शिवस्थानांची माहिती हा ग्रंथाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगांच्या पौराणिक कथा, ऐतिहासिक संदर्भ, मंदिरांचा जीर्णोद्धार आणि त्यांच्याशी निगडित स्थानिक श्रद्धा यांचा मागोवा घेतला आहे. अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराची माहितीही या संदर्भात वाचायला मिळते.
कोकणातल्या देवस्थानांचा परिचय करून देताना तेथील लोकपरंपरांचं वेगळेपणही स्पष्ट होतं. देवगड जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं कुणकेश्वर मंदिर, त्याच्या निर्मितीशी जोडलेली मुस्लीम व्यापाऱ्याची दंतकथा आणि मंदिराच्या वास्तुरचनेत दिसणारा हिंदू-मुस्लीम स्थापत्यशैलीचा संगम यांची माहिती रंजक आहे. मालवण आणि गोवा परिसरातली श्रीदेव रवळनाथ देवस्थानाची परंपराही विशेष लक्षवेधी आहे. तेथील कौल-प्रसाद, तरंग आणि झांटये, शेणई, घोटगे, बोके, तानवडे अशा विविध कुळांचे कुळाचार यांचं तपशीलवार वर्णन ग्रंथात वाचायला मिळतं.
विदर्भातील अमरावती आणि सालबर्डी परिसरातील महादेवाच्या यात्रेची माहितीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात्रेच्या निमित्तानं निघणारे ‘पोहे’, रेड्यांच्या शर्यती आणि शंकरपट यांसारख्या परंपरांतून ग्रामीण जीवनातला उत्साह आणि सामूहिक सहभाग दिसून येतो. मंदिरांच्या स्थापत्यवैभवाचाही ग्रंथात स्वतंत्रपणे विचार केला आहे. ९६ गजराजांच्या शिल्पांवर उभं असलेलं कोपेश्वर मंदिर आणि त्याचा स्वर्गमंडप यांचं वर्णन वाचताना त्या काळातल्या स्थापत्यकलेची कल्पना येते.
या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा भौगोलिक आवाका केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातल्या गडकोटांवर स्थापन केलेल्या शिवस्थानांबरोबरच इंडोनेशियातील बाली बेटावरील शिवपूजेचीही माहिती यात दिली आहे. तेथील विशाखी उत्सव, ‘बाले कुळकुळ’ या लाकडी घंटा आणि ‘सद-काह्यांगन’ मंदिरांची माहिती वाचताना शिवोपासनेच्या परंपरेचा महाराष्ट्राबाहेरही किती विस्तार झाला होता, हे लक्षात येतं. त्यामुळे या ग्रंथाला केवळ प्रादेशिक नव्हे, तर व्यापक सांस्कृतिक संदर्भ मिळतो.
ग्रंथाच्या दुसऱ्या विभागात लोकमानसात रुजलेल्या कथा-कहाण्यांना स्थान दिलं आहे. ‘मधुर मीलन’, ‘नवशीचा घोटेश्वर’, ‘तुकाई’, ‘अभ्यंग स्नान’, ‘गौतमी गंगा’ अशा कथांमधून देवदेवतांचे मानवी स्वभावधर्म, भक्तांच्या श्रद्धा, नवस आणि विविध धार्मिक परंपरा यांचं दर्शन घडतं. गौरी आणि गंगा यांच्यातल्या सवती-सवतींचा कलह असो किंवा भक्ताच्या हाकेला धावून येणारी देवता असो, या कथांमधून लोकांनी देवाला आपल्या जीवनाचा एक भाग कसं बनवलं आहे, हे समजतं. या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर तत्कालीन समाजाचं भावविश्व, त्यांच्या समजुती आणि जीवनपद्धतीही जपतात.
या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संशोधन आणि लोकश्रद्धा यांचा साधलेला समतोल. श्री. स. के. कुलकर्णी, श्री. डी. डी. रेगे, डॉ. म. श्री. माटे, प्रा. रा. पा. पांढरीपांडे आणि पं. वसंत गाडगीळ अशा अभ्यासकांनी ऐतिहासिक कागदपत्रं, शिलालेख, बखरी आणि वास्तुकलेच्या आधारे विविध देवस्थानांचा अभ्यास मांडला आहे. त्याच वेळी सामान्य भक्तांच्या श्रद्धा, नवस, कुळाचार आणि लोककथा यांनाही तितकंच महत्त्व दिलं आहे. त्यामुळे हा ग्रंथ अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथ ठरतो, तर सामान्य वाचकांना आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडणारा अनुभव देतो.
सरोजिनीबाईंच्या लेखनाची खासियत म्हणजे विषय कितीही अभ्यासपूर्ण असला, तरी त्यांची भाषा सहज आणि ओघवती असते. लोकजीवनाचा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आणि लोकपरंपरांविषयीची आत्मीयता त्यांच्या लेखनातून सतत जाणवते. ‘रानफूल’ हा निबंध वाचताना किंवा ग्रंथातील विविध विभागांच्या प्रस्तावना वाचताना आपण एखाद्या ग्रामीण यात्रेत, मंदिराच्या प्रांगणात किंवा एखाद्या जुन्या घरातल्या कुळाचाराच्या प्रसंगात सहभागी झाल्यासारखं वाटतं. त्यांच्या लेखनात लोकसंस्कृतीचं वर्णन आहेच; पण त्यामागे त्या संस्कृतीविषयीची जिव्हाळ्याची समजही आहे.
ग्रंथात विविध देवस्थानांची छायाचित्रं, रेखाचित्रं, मंदिरांची वैशिष्ट्यं आणि शेवटी दिलेली सविस्तर सूची यांमुळे त्याचं संदर्भमूल्य वाढलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातल्या कुलदैवतांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम या ग्रंथानं केलं आहे.
आजच्या शहरीकरणाच्या काळात अनेक कुटुंबं आपल्या मूळ गावापासून दूर गेली आहेत. नव्या पिढीला आपल्या घराण्याचं कुलदैवत कोणतं, त्याची यात्रा कधी असते, आपले कुळाचार कोणते आणि त्यामागच्या परंपरा काय आहेत, याची माहितीही अनेकदा नसते. अशा वेळी ‘कुलदैवत’ हा ग्रंथ त्यांना आपल्या मुळांचा शोध घ्यायला मदत करतो. आपल्या घराण्याच्या श्रद्धा आणि परंपरांचा मोठा सांस्कृतिक पट त्यातून उलगडतो. म्हणूनच पहिल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकात व्यक्त झालेला हा विचार महत्त्वाचा वाटतो : “आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जाताना हा ग्रंथ वाचून व पदरी बाळगूनच पाऊल उचलायचा मोह वाचकांना होतो.”
सरोजिनीबाईंनी संपादित केलेला ‘कुलदैवत’ हा ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा, धार्मिक श्रद्धांचा आणि सांस्कृतिक परंपरांचा समृद्ध दस्तऐवज आहे. विविध ठिकाणी विखुरलेली माहिती गोळा करून, तिचं संशोधन आणि संपादन करून ती पुढच्या पिढ्यांसाठी उपलब्ध करून देणं हे सरोजिनीबाईंचं मोठं योगदान आहे. लोकसाहित्य म्हणजे केवळ गाणी, कथा आणि म्हणी नव्हेत, तर त्यात समाजाचं संपूर्ण जीवन सामावलेलं असतं, याची जाणीव हा ग्रंथ करून देतो.
‘कुलदैवत’ हा केवळ धार्मिक श्रद्धेचा ग्रंथ नाही. तो आपल्या समाजाच्या इतिहासाचा, सामूहिक स्मृतींचा आणि सांस्कृतिक ओळखीचा शोध आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी कुटुंबाच्या संग्रही असावा, असा हा महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. महाराष्ट्राच्या लोकमानसाचं अंतरंग समजून घ्यायचं असेल, तर या ग्रंथाचं वाचन निश्चितच समृद्ध करणारा अनुभव ठरतो.