डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
महाराष्ट्राचं लोकजीवन समृद्ध करणाऱ्या अनेक परंपरा आपल्या दैनंदिन व्यवहारांतून निर्माण झाल्या आहेत. त्यात सण-उत्सव, रूढी, लोकगीते आणि धार्मिक विधी यांच्याइतकंच महत्त्व हस्तकलांनाही आहे. जुन्या काळात गावं बहुतांशी स्वयंपूर्ण होती. गावातील लोकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू गावातच तयार होत. कुंभार, सुतार, लोहार, बुरुड, सोनार, शिंपी अशा विविध कारागिरांच्या हातून या वस्तू तयार होत असत. गरजेतून निर्माण झालेल्या या वस्तूंना त्यांच्या कल्पकतेमुळे आणि कौशल्यामुळे कलात्मक रूप मिळालं. या कारागिरीतूनच ग्रामीण जीवनाचं एक वेगळं सांस्कृतिक विश्व आकाराला आलं.
या विश्वाची ओळख करून देणारा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सरोजिनीबाईंनी संपादित केलेला ‘कारागिरी’. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य मालेतील हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. महाराष्ट्रातील लोककला, पारंपरिक व्यवसाय, हस्तकौशल्य, वस्त्रकला, आदिवासींच्या कलापरंपरा आणि हस्तलिखितांमधील कलात्मकता अशा विविध विषयांचा यात समावेश आहे. एकूण २३ लेखांमधून वेगवेगळ्या कलाप्रकारांचा आणि त्यामागच्या लोकजीवनाचा परिचय करून दिला आहे.
हा ग्रंथ वाचताना लक्षात येतं की, कारागिरी म्हणजे केवळ एखादी वस्तू तयार करण्याचं तंत्र नाही. त्यात माणसाचं कौशल्य, कल्पकता, सौंदर्यदृष्टी, परंपरेशी असलेलं नातं आणि जगण्याची धडपड या सगळ्यांचा समावेश आहे.
ग्रंथाच्या सुरुवातीलाच डॉ. सरोजिनी बाबर यांनी ‘जोखण्याजोगी कलाकुसर!’ या लेखातून कारागिरीचं वेगळंच दर्शन घडवलं आहे. त्यांच्या मते, देशाचं खरं भांडवल म्हणजे इथला सर्वसामान्य माणूस. आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीतून तो गरजेच्या वस्तू तयार करतो. मात्र, केवळ गरज भागवणं एवढाच त्याचा उद्देश नसतो. त्या वस्तूंना सुंदर रूप देण्याची त्याची सहज प्रवृत्तीही असते.
या लेखात सरोजिनीबाईंनी अनेक कारागिरांची ओळख करून दिली आहे. बोटीवर भेटलेला कापडावर राघू-मैना, कुत्री-मांजरी अशी चित्रं काढणारा एकुलता एक कशिदाकार, नेवासे येथे दगडावर छिन्नी मारून मूर्ती घडवणारा पाथरवट आणि डोळ्यांवर ताण घेऊन चांदीचं जाळीदार कमळ तयार करणारा वृद्ध सोनार अशा अनेक कलावंतांची चित्रं त्या उभी करतात. या प्रत्येकाच्या कामामागे प्रचंड मेहनत, चिकाटी आणि कलेविषयीची निष्ठा आहे.
गावागावांत आढळणाऱ्या कारागिरांचं वर्णन करताना त्या कुंभाराच्या चाकावर आकार घेणाऱ्या मोगा, डेरा, घट, तरळ, टींगाणी, गाडगी, शेगड्या आणि चुली यांची आठवण करून देतात. नागपंचमी आणि बेंदरासाठी तयार होणारे मातीचे नाग आणि बैलही याच कारागिरीचा भाग आहेत. मातीच्या गोळ्याला आकार देणारा कुंभार जणू ब्रह्मदेवच!
लग्नाच्या वरातीसाठी नक्षत्रमाला आणि पाळण्यातील खेळणी तयार करणारा जिनगर, फुलं वेचण्यासाठी टोपल्या, परड्या, सुपं आणि चाळण्या विणणारा बुरुड, वाखाच्या धाग्यांपासून शिंकी, मुस्की, गोफण आणि कासरे बनवणारे कारागीर, तर कापडाच्या रंगीबेरंगी तुकड्यांपासून वाकळ, कुंची, अंगडी-टोपडी शिवणारे शिंपी अशा अनेकांच्या कामातून ग्रामीण जीवनाची गरज आणि कलात्मकता एकत्र आलेली दिसते.
या कलाकारांविषयी सरोजिनीबाईंना विशेष आत्मीयता आहे. त्या लिहितात,
"असे हे कलाकार जगावेगळे. आपल्याजवळ जे आहे त्यालाच नटवीत उदात्त स्वरूप देऊन मोकळे होणारे. निसर्गाशी सामना करीत आपलं वैशिष्ट्य दाखवून देणारी ही मंडळी!"
या काही शब्दांतच त्यांच्या संपूर्ण लेखाचा आशय सामावलेला आहे.
‘कारागिरी’मध्ये केवळ व्यवसाय म्हणून केल्या जाणाऱ्या कलांचाच विचार नाही. घराच्या भिंती, अंगण आणि सणावाराच्या सजावटीतून व्यक्त होणाऱ्या लोकांच्या सौंदर्यदृष्टीचाही वेध घेतला आहे.
प्रा. गजमल माळी यांनी ‘म्हाटी लोककला’ या लेखातून महाराष्ट्रातील भित्तिचित्रांची परंपरा उलगडली आहे. अजिंठ्याच्या भित्तिचित्रांपासून ते ग्रामीण घरांच्या भिंतींवर चुन्याच्या निवळीने काढलेल्या चित्रांपर्यंत या कलेचा प्रवास यात दिसतो. पीथोळी पूजा, कानबाई, गौराई आणि नागपंचमीच्या चित्रांमधून ग्रामीण स्त्रियांची कलात्मकता व्यक्त होते.
रांगोळी हा आणखी एक महत्त्वाचा लोककलाप्रकार. डॉ. भैयासाहेब ओंकार आणि सरोजिनीबाई यांनी रांगोळीच्या परंपरेचा अभ्यास केला आहे. रांगोळी ही केवळ घराची शोभा वाढवणारी सजावट नाही. तिच्यामागे धार्मिक श्रद्धा, मांगल्याची भावना आणि धरित्रीविषयीचा आदर आहे. महाराष्ट्रातील ठिपक्यांची रांगोळी, बंगालमधील अल्पना, राजस्थानमधील मांडना आणि माळव्यातील चौकपूर्णा अशा विविध प्रांतांतील रांगोळीच्या प्रकारांचीही माहिती यात मिळते.
सरोजिनीबाईंचा ‘सुशोभन’ हा लेखही विशेष लक्षवेधी आहे. दिवाळी-दसऱ्यासारख्या सणांच्या वेळी घर सजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू आणि पद्धतींचं त्यांनी रंजक वर्णन केलं आहे. चिंचोक्यांपासून अक्षरं मांडणं, फुटक्या काचा रोवून नक्षीकाम करणं किंवा मेणबत्तीच्या थेंबांपासून टिकल्या तयार करून त्यांचे हार गुंफणं, या साध्या वाटणाऱ्या गोष्टींतूनही ग्रामीण माणसाची कल्पकता दिसून येते.
भारतीय हस्तकलेचा विचार करताना कुंभारकामाला विशेष स्थान द्यावं लागतं. डॉ. श. रा. राणे यांनी ‘कुंभारकला’ या लेखातून या कलेचा इतिहास आणि तिचं सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केलं आहे. मातीची भांडी ही माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग राहिली आहेत. सातवाहन काळातील ताट-वाटी संचापासून ते लग्नसमारंभात वापरल्या जाणाऱ्या गौरीहार, न्हाणोळे, बेमाथनी आणि छत्तीस मडक्यांची वयी अशा विविध वस्तूंचा यात परिचय होतो. मातीच्या वस्तूंचा उपयोग केवळ घरगुती कामांसाठी होत नव्हता, तर धार्मिक आणि सामाजिक विधींमध्येही त्यांना महत्त्वाचं स्थान होतं.
वस्त्रकलेचा विचार करताना श्री. अ. दि. कोकड यांचा ‘देशी भरतकाम’ हा लेख महत्त्वाचा ठरतो. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये भरतकामाच्या स्वतंत्र परंपरा विकसित झाल्या आहेत. पंजाबची फुलकारी, बंगालची कंथा, लखनऊची चिकनकारी, काश्मीरमधील नम्दा आणि गब्बा, गुजरातमधील किडियाकाम अशा कलाप्रकारांची माहिती या लेखात मिळते. महाराष्ट्रातील गोधडी आणि वाकळ यांचाही या परंपरेत समावेश होतो. जुन्या कपड्यांच्या तुकड्यांपासून तयार होणाऱ्या या वस्तूंमध्ये उपयुक्ततेबरोबरच रंगसंगती आणि रचनेचं सौंदर्यही जपलेलं असतं.
डॉ. ग. मो. पाटील यांचा ‘चुड्याची पर्वणी’ हा लेख बांगड्यांच्या परंपरेचा वेध घेतो. काचेच्या, तारेच्या आणि सोन्याच्या चुड्यांना स्त्रीजीवनात असलेलं स्थान, त्यांच्याशी जोडलेल्या भावना आणि लोकगीतांमधील त्यांचे उल्लेख यात येतात. कृष्णाने कासाराचं रूप घेऊन राधेला आणि रुक्मिणीला चुडा भरल्याच्या लोककथाही या लेखात आढळतात. त्यामुळे बांगडी ही केवळ अलंकाराची वस्तू न राहता लोकश्रद्धा आणि भावविश्वाचा भाग बनते.
या ग्रंथातील आणखी एक महत्त्वाचा विभाग म्हणजे आदिवासींच्या कलापरंपरांचा. डॉ. गोविंद गारे, अनुताई वाघ, श्री. श्री. रा. पोतदार आणि डॉ. सौ. नंदा देशपांडे यांसारख्या अभ्यासकांनी आदिवासींच्या जीवनातील कलात्मकतेचे विविध पैलू मांडले आहेत.
वारली चित्रकला हा त्यातील विशेष परिचित कलाप्रकार. मात्र आदिवासींची कला केवळ चित्रांपुरती मर्यादित नाही. लाकूड आणि बांबूपासून तयार होणारी खेळणी, तारपा हे वाद्य, तांब्या-पितळेचे दागिने, पक्ष्यांच्या पिसांपासून आणि झाडांच्या सालींपासून तयार होणारे अलंकार अशा अनेक गोष्टी त्यांच्या कलाविश्वाचा भाग आहेत. त्यांचे सण, उत्सव, नृत्य आणि वाद्यपरंपरा यांतून निसर्गाशी असलेलं त्यांचं जवळचं नातं व्यक्त होतं.
या कलांकडे पाहताना आदिवासी समाजाचं जीवन, त्यांच्या श्रद्धा आणि निसर्गाशी जुळलेली जीवनशैली यांचीही ओळख होते. त्यामुळे हा विभाग हस्तकलेच्या अभ्यासाबरोबरच आदिवासी संस्कृती समजून घेण्यासाठीही उपयुक्त ठरतो.
भारतीय संस्कृतीत दिव्याला केवळ प्रकाश देणारी वस्तू म्हणून पाहिलं जात नाही. त्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक महत्त्वही आहे. श्री. डी. जी. केळकर यांनी ‘दीपलक्ष्मी’ या लेखातून दिव्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या विकासाचा परिचय करून दिला आहे. प्राचीन काळातील दगडी आणि टेराकोटाचे दिवे, आरतीदीप, गजदीप अशा अनेक प्रकारांमधून भारतीय दीपपरंपरेचं वैविध्य समोर येतं.
हस्तकलेचं आणखी एक वेगळं रूप हस्तलिखित पोथ्यांमध्ये पाहायला मिळतं. डॉ. यू. म. पठाण आणि श्री. वा. ल. मंजूळ यांनी पोथ्यांमधील रंगरेषा, सुलेखन, चित्रांची सजावट आणि पारंपरिक कागदनिर्मिती यांचा परिचय करून दिला आहे. अक्षरांची मांडणी, रंगांचा वापर आणि पानांची सजावट यांतून त्या काळातील कलाकारांची सौंदर्यदृष्टी दिसून येते. ज्ञान जतन करण्याच्या प्रक्रियेतही कलेला किती महत्त्वाचं स्थान होतं, हे या लेखांमधून समजतं.
या ग्रंथाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यात कारागिरीकडे केवळ वस्तुनिर्मिती म्हणून पाहिलेलं नाही. प्रत्येक कलेमागे असलेलं माणूसपण आणि त्या कलेशी जोडलेलं लोकजीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सरोजिनीबाईंच्या लेखनात ग्रामीण जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण आणि त्याविषयीची आत्मीयता जाणवते. त्या एखाद्या कारागिराच्या कामाचं केवळ वर्णन करत नाहीत, तर त्या कामामागची मेहनत, त्याची परिस्थिती आणि त्याचं कौशल्यही वाचकांसमोर आणतात. त्यांच्या भाषेत ग्रामीण जीवनाचा सहजपणा आहे. त्यामुळे कुंभाराचं चाक, बुरुडाची टोपली किंवा शिंप्याच्या दुकानातील रंगीबेरंगी कापडं वाचताना डोळ्यांसमोर उभी राहतात.
या ग्रंथात महाराष्ट्राबरोबरच भारतातील अन्य प्रांतांतील कलापरंपरांचाही समावेश आहे. त्यामुळे विविध प्रदेशांतील कारागिरीतील साम्य आणि वेगळेपण लक्षात येतं. लेखांना पूरक असलेली चित्रं आणि रेखाटनं यांमुळे या कलांचं स्वरूप अधिक स्पष्ट होतं.
विशेष म्हणजे, यंत्रनिर्मित वस्तूंचा प्रसार होण्यापूर्वी समाजाच्या दैनंदिन गरजा भागवण्यात या कारागिरांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कौशल्यामुळे अनेक पारंपरिक व्यवसाय टिकून राहिले. बदलत्या काळात त्यांपैकी काही कला मागे पडत आहेत. अशा वेळी त्यांचं दस्तऐवजीकरण करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यांची ओळख पोहोचवणं आवश्यक आहे. ‘कारागिरी’सारखा ग्रंथ हे काम महत्त्वपूर्ण रीतीने करतो.
‘कारागिरी’ हा ग्रंथ वाचताना आपल्या लक्षात येतं की, लोकसंस्कृती ही केवळ गाणी, कथा, सण आणि उत्सव यांतूनच व्यक्त होत नाही. ती माणसाच्या हातांतून तयार होणाऱ्या वस्तूंमध्येही तितक्याच प्रभावीपणे दिसते. मातीच्या भांड्यापासून भरतकाम केलेल्या वस्त्रापर्यंत, बांबूच्या टोपलीपासून चांदीच्या दागिन्यापर्यंत आणि रांगोळीपासून हस्तलिखित पोथ्यांपर्यंत प्रत्येक कलाकृतीत त्या समाजाच्या जगण्याची पद्धत आणि सौंदर्यदृष्टी सामावलेली आहे.
सरोजिनीबाईंनी संपादित केलेला हा ग्रंथ म्हणजे अशा असंख्य ज्ञात-अज्ञात कलाकारांच्या कौशल्याची ओळख करून देणारा सांस्कृतिक दस्तऐवज आहे. त्यांच्या हातांनी घडवलेल्या वस्तूंमधून लोकजीवनाचं सौंदर्य आणि समृद्धी आपल्यासमोर येते. या कारागिरांच्या कामाकडे नव्या दृष्टीनं पाहायला शिकवणं, हेच या ग्रंथाचं खरं महत्त्व आहे.